संगमेश्वर (दिनेश आंब्रे): एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प देवरुख अंतर्गत बुरंबी बीटमधील नावडी ग्रामपंचायत हद्दीतील रामपेठ अंगणवाडीत श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोकुळाष्टमीनिमित्त दहीहंडी उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. बालविकास प्रकल्प अधिकारी प्रथमेश इंगवले व बीट पर्यवेक्षिका रेश्मा सासणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नावडीच्या प्रशासक प्रज्ञा कोळवनकर, प्रशासक विवेक शेरे, कुरधुंडा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष इरफान नेवरेकर, सामाजिक कार्यकर्ते विनय मुरकर आणि आलोक जाधव उपस्थित होते. प्रारंभी अंगणवाडी सेविका पल्लवी शेरे यांनी उपस्थितांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले व गोकुळाष्टमीचे महत्त्व विषद केले.
उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे अंगणवाडीतील चिमुकल्यांनी साकारलेली राधा-कृष्णाची रूपे ठरली. पारंपरिक व आकर्षक वेशभूषेत सजलेल्या या बाळगोपाळांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली. “गोविंदा रे गोपाळा” आणि “राधाकृष्ण-गोपाळकृष्ण” अशा जयघोषात लहान मुलांनी पारंपरिक पद्धतीने दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला.
कार्यक्रमाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते जनार्दन शिरगावकर, इरफान नेवरेकर, ज्ञानसी पोवळे आणि महिला सुरक्षा समितीच्या सदस्या अर्चिता राहुल कोकाटे यांच्या वतीने सर्व मुलांना मान्यवरांच्या हस्ते फळे व खाऊचे वाटप करण्यात आले. या सोहळ्याला पालकांनीही उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली होती. कार्यक्रमाचे नियोजन अंगणवाडी सेविका पल्लवी शेरे आणि मदतनीस शीतल आंब्रे यांनी केले. प्रास्ताविक व देणगीदारांचे आभार पल्लवी शेरे यांनी मानले, तर आभार प्रदर्शन शीतल आंब्रे यांनी केले.






