रत्नागिरी : रत्नागिरीसह राज्यातील विविध भागांत सामान्य जनतेशी सलोख्याचे संबंध राखणारे पोलीस अधिकारी सुरेश दिनकर कदम यांची लांजा उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) म्हणून बढतीने नियुक्ती झाली आहे. पुणे क्राईम ब्रँचसह विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस निरीक्षक म्हणून त्यांनी केलेल्या यशस्वी कामगिरीच्या पार्श्वभूमीवर ही निवड करण्यात आली आहे. त्यांच्या पदोन्नतीमुळे लांजा उपविभागात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मूळचे सांगली जिल्ह्यातील असलेले सुरेश कदम यांनी 1995 साली पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेत प्रवेश केला. मुंबईत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबईसह कोल्हापूर, रत्नागिरी (शहर व जयगड) येथे आपल्या कार्यतत्परतेचा ठसा उमटवला.
विशेष बाब म्हणजे, पोलीस उपनिरीक्षक असतानाच रत्नागिरीतील एका पोलीस ठाण्याचा स्वतंत्र कार्यभार सांभाळणारे ते पहिले अधिकारी ठरले. त्यामुळेच त्यांना लवकरच सहायक पोलीस निरीक्षकपदी बढती मिळाली.
पोलीस निरीक्षक म्हणून त्यांनी रत्नागिरी पोलीस जिल्ह्यातील विशेष शाखा व ग्रामीण पोलीस ठाण्यात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या. त्यानंतर गोंदिया, पालघर, ठाणे ग्रामीण आणि भोईसर आदी ठिकाणी प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक गुन्हेगारी प्रकरणांचा यशस्वी तपास लावला.
त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत, गतवर्षी त्यांना राष्ट्रपती पदक पुरस्काराने गौरवण्यात आले.
लांजा डीवायएसपीपदी सुरेश कदम यांची नियुक्ती
