GRAMIN SEARCH BANNER

महावितरणकडून सहा महिन्यात  13 हजार 722 नवीन ग्राहकांना वीज जोडणी

Gramin Search
8 Views

रत्नागिरी परिमंडलात वीज ग्राहकांना तात्काळ सेवा

रत्नागिरी-  ‘सुकर जीवनमान’ संकल्पनेनुसार वीजग्राहकांना उत्तम सेवा देण्याबरोबरच नवीन ग्राहकांना तात्काळ वीजजोडणी देण्यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे. त्या अनुषंगाने गेल्या सहा महिन्यात (१ जानेवारी ते ३० जून) रत्नागिरी परिमंडलात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक इतर अशा विविध वर्गवारीतील 13 हजार 722 वीज ग्राहकांना नवीन वीजजोडणी देण्यात आली. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 8 हजार 535 ग्राहकांचा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 5 हजार 187 ग्राहकांचा समावेश आहे.

नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने ‘इझ ऑफ लिव्हिंग’ संकल्पना आणली आहे. वीज ही आज मुलभूत गरज बनलेली असल्याने अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठ्याचा समावेश या संकल्पनेत करण्यात आलेला आहे. त्यानुसार रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीज नियामक आयोगाने निर्धारीत केलेल्या कृती मानकांनुसार विहित कालावधीत नवीन वीजजोडणी देणे, अखंडित व दर्जेदार वीजपुरवठ्यासह ग्राहकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडविण्यावर भर देण्यात येत आहे.

गेल्या सहा महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात 06 हजार 755 घरगुती ग्राहकांना, 1 हजार 126 वाणिज्य ग्राहकांना, 102 औद्योगिक ग्राहकांना व 552 इतर वर्गवारीतील ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील महावितरणच्या  तीन विभागांपैकी रत्नागिरी विभागात सर्वाधिक 3 हजार 815 वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.

सिंधुदुर्ग् जिल्ह्यात 3 हजार 940 घरगुती ग्राहकांना,  618  वाणिज्य ग्राहकांना, 84 औद्योगिक ग्राहकांना व 545 इतर वर्गवारीतील ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणच्या दोन विभागांपैकी कणकवली विभागात सर्वाधिक 2 हजार 936 वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.

सध्या, महावितरण ‘कृती मानके’नुसार जिथे वीज यंत्रणा नव्याने उभी करण्याची आवश्यकता नाही अशा शहरी भागात सात दिवसांत तर ग्रामीण भागात पंधरा दिवसांच्या आत वीज जोडणी देण्यात येते. ग्राहकांना नवीन जोडणी बाबत अधिक माहिती हवी असल्यास ते नजीकच्या महावितरण कार्यालयात संपर्क साधू शकतात.

आज ग्राहकांना घरी बसल्या, संकेतस्थळ व मोबाईल अँपच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने वीज जोडणीचा अर्ज सादर करता येतो. त्यामुळे ग्राहकांनी अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा असे आवाहन रत्नागिरी महावितरण तर्फे करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

2652218
Share This Article