GRAMIN SEARCH BANNER

खेडमध्ये पतसंस्थेची २५ लाखांची फसवणूक; पतसंस्थेत गहाण ठेवलेले फ्लॅट परस्पर फायनान्समध्येही ठेवले

खेड : खेडमध्ये पतसंस्थेची २५ लाखांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतसंस्थेत गहाण ठेवलेले फ्लॅट परस्पर फायनान्समध्येही ठेवून पतसंस्थेची 25 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील प्रभाकर सागवेकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

तालुक्यात मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेची सुमारे २५ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी पतसंस्थेचे सरव्यवस्थापक अनिल भिकाजी विचले यांनी खेड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २८ फेब्रुवारी २०१४ ते ८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत घडली. भरणे, खेड येथील मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेत सुनील प्रभाकर सागवेकर यांनी त्यांच्या मालकीची समर्थनगर, भरणे येथील भू-मापन क्र. ६६/अ मधील ‘सिद्धिविनायक निकेतन’ इमारतीतील ‘अ’ विंगमधील तळमजल्यावरील निवासी सदनिका क्रमांक ए-०१, ए-०२ आणि ए-०३ या पतसंस्थेकडे गहाण ठेवल्या होत्या. मात्र, सागवेकर यांनी पतसंस्थेशी केलेला हा करार डावलून, त्याच मालमत्ता श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड, चिपळूण यांच्याकडे गहाणखत( क्र. ११७८/२०१६ आणि १२१८/२०१६) नुसार पुन्हा गहाण ठेवून पतसंस्थेचा विश्वासघात केला आणि फसवणूक केली. यामुळे पतसंस्थेचे सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

या गंभीर आर्थिक फसवणुकीबद्दल २० जून २०२५ रोजी सायंकाळी ५.४६ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार आरोपी सुनील प्रभाकर सागवेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे सहकारी बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Total Visitor

0217883
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *