GRAMIN SEARCH BANNER

लांजाचा साहिल सरफरे देशसेवेसाठी सज्ज; भारतीय वायुसेनेत मेडिकल असिस्टंट पदावर नियुक्ती

लांजा : शहरातील आगरवाडी येथील साहिल सुरेश सरफरे याने भारतीय वायुसेनेचे कठोर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून मेडिकल असिस्टंट या पदावर नियुक्ती मिळवली आहे. नुकत्याच बेंगलोर येथे झालेल्या पासिंग आऊट परेडमध्ये त्याने यशस्वी सहभाग नोंदवला. या बॅचमध्ये एकूण ११८ जवानांनी प्रशिक्षण पूर्ण केले.

साहिलचे प्राथमिक ते दहावी पर्यंतचे शिक्षण कै. एकनाथ राणे इंग्लिश मिडीयम स्कूल लांजा येथे झाले. अकरावी-बारावी शिक्षण त्याने लांजा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेत पूर्ण केले. गतवर्षी भारतीय वायुसेनेच्या भरती परीक्षेत त्याने देशभरात पंधरावी रँक मिळवत यश संपादन केले होते.

साहिलने १४ महिन्यांचे प्रशिक्षण तीन टप्प्यांमध्ये पूर्ण केले. प्रथम बेंगलोर, नंतर गोरखपूर (उत्तरप्रदेश) आणि पुन्हा बेंगलोर येथे प्रशिक्षण घेतले. आता त्याची नियुक्ती पंजाब-पाकिस्तान सीमेवर करण्यात आली असून लवकरच तो देशसेवेसाठी रुजू होणार आहे.

या परेड सोहळ्याला साहिलचे आई-वडील आणि बहीण उपस्थित होते. हा क्षण कुटुंबासाठी अभिमानाचा ठरला. शालेय जीवनापासूनच क्रीडेत आवड असलेल्या साहिलने कबड्डी खेळात लांजा आगरवाडी संघातून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

देशसेवेत पदार्पण करत साहिल सरफरेने लांजा तालुक्याचे नाव उज्ज्वल केले असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे

Total Visitor Counter

3416598
Share This Article