GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीतील महेश काळेंचा कार्यक्रम अचानक रद्द; रसिक संतप्त झाल्याने पोलिसांनी धाव

रत्नागिरी: सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या गायकीचा आस्वाद घेण्यासाठी जमलेल्या रत्नागिरीतील शेकडो संगीतप्रेमींचा रविवारी पुरता रसभांग झाला. गेल्या दोन आठवड्यांपासून मोठ्या दिमाखात जाहिरातबाजी करण्यात आलेला हा कार्यक्रम ऐनवेळी तांत्रिक कारणास्तव रद्द झाल्याने प्रमोद महाजन मैदानावर एकच गोंधळ उडाला. बाहेरगावाहून आलेल्या रसिकांना कार्यक्रम होणार नसल्याचे समजताच त्यांनी आयोजकांना धारेवर धरले, ज्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊन अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले.

५ एप्रिल रोजी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी अनेक चाहत्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन तिकिटे खरेदी केली होती. सायंकाळच्या वेळी रसिक मोठ्या उत्साहात मैदानावर पोहोचले, मात्र तिथे कोणतीही जय्यत तयारी नसल्याचे पाहून अनेकांच्या मनात शंका पालवली. कार्यक्रम रद्द झाल्याची कोणतीही पूर्वसूचना न मिळाल्याने प्रेक्षकांचा पारा चढला आणि आयोजकांशी त्यांची जोरदार वादावादी झाली.

या गोंधळामुळे मैदानावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.
या संपूर्ण प्रकरणावर आयोजक दिव्येश बापट आणि गंधार जोग यांनी स्पष्टीकरण दिले असून, अपरिहार्य तांत्रिक अडचणींमुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे सांगितले. तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्मवर आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे प्रेक्षकांना वेळेत माहिती देता आली नाही, असेही त्यांनी नमूद केले. उपस्थित सर्व प्रेक्षकांना ऑफलाईन तिकिटांचा परतावा करण्यात आला असून, ऑनलाईन बुकिंग केलेल्यांचे पैसे पुढील दोन ते तीन दिवसांत त्यांच्या खात्यावर जमा केले जातील, असे आश्वासन आयोजकांनी दिले आहे. तूर्तास, मोठ्या अपेक्षेने आलेल्या संगीतप्रेमींना मात्र रिकाम्या हाताने घरी परतावे लागले.

Total Visitor Counter

3416687
Share This Article