रत्नागिरी: योगाभ्यासामध्ये आत्महत्येपासूनही परावृत्त करण्याची मोठी शक्ती आहे. मनःशांतीसाठी प्रत्येकाने दररोज नियमितपणे योगाभ्यास करावा, असे आवाहन पतंजली योग समितीच्या प्रांत कार्यकारणी सदस्य रमाताई जोग यांनी केले.
रत्नागिरीतील योगशिक्षक अनंत मुकुंद आगाशे यांनी लिहिलेल्या मंत्र आरोग्याचा या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. येथील ओम साई मित्र मंडळातर्फे चालविल्या जाणाऱ्या योग कक्षाच्या सभागृहात हा समारंभ पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, धावपळीच्या आजच्या जीवनात समाजाचे मनस्वास्थ्य हरवले आहे. ते टिकविण्यासाठी योगाभ्यासासारखा दुसरा पर्याय नाही. मी स्वतः पहाटे साडेतीन वाजता उठून योगाभ्यास करते. योगगुरू रामदेवबाबा यांनी संपूर्ण भारतभर सुरू केलेल्या योगाभ्यासाची चळवळ आता झाली आहे. गेल्या अकरा वर्षांपासून दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. संपूर्ण जगाला योगाभ्यासाचे महत्त्व कळले आहे. म्हणूनच प्रत्येकाने दैनंदिन जीवनात योगाभ्यास केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. पतीच्या अर्धांगवायूच्या आणि स्वतःच्या मणक्याच्या आजारावर योगाभ्यासामुळे कसा आराम पडला, हे त्यांनी विशद केले.
श्री. आगाशे १५ वर्षांपेक्षा अधिक काळ ॐ साई सांस्कृतिक भवनात निःशुल्क योगवर्ग घेत आहेत. त्याविषयीच्या त्यांच्या या पुस्तकाचे लेखन त्यांच्यासह त्यांचे सहकारी योगशिक्षक मिलिंद सरदेसाई यांनी केले आहे. त्याबाबत प्रास्ताविकात माहिती देताना आगाशे म्हणाले, सध्याच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याच्या समस्या पदोपदी सर्वांनाच भेडसावत आहेत. बदलती जीवनशैली हे याचे प्रमुख कारण आहे. म्हणूनच ‘आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीप्रमाणे कशाला महत्त्व द्यायचे, याचा विचार प्रत्येक नागरिकाने करावा. या पुस्तकातून नवीन योग शिकू इच्छिणाऱ्या लोकांना थोडासा सराव आणि पुस्तक वाचून घरी योग, प्राणायाम करता येईल. सर्व नागरिकांनी दररोज या पुस्तकाचा संदर्भ घेऊन यौगिक जॉगिंग, योग-प्राणायाम, सूक्ष्म व्यायाम आणि सूर्य नमस्काराचा सराव करावा आणि निरोगी राहावे. आगाशे यांनी त्यांना मेंदूशी संबंधित आजारात आलेला अनुभव यावेळी सांगितला.
योगाभ्यासासाठी संदर्भ पुस्तक म्हणून असलेली उपयुक्तता लक्षात घेऊन या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे, असे सत्त्वश्री प्रकाशनाचे प्रमोद कोनकर यांनी सांगितले.
योग या विषयावरची आणखी पुस्तके आगाशे यांनी साध्या सोप्या भाषेत लिहावीत, अशा शब्दांत योगशास्त्र विषयात सुवर्णपदकासह बी. ए. पदवी प्राप्त केलेले पतंजलीचे संघटनमंत्री विनय साने यांनी आगाशे यांना शुभेच्छा दिल्या. सहयोगशिक्षिका पौर्णिमा दाते यांनीही योगवर्गाच्या वाटचालीचा आढावा घेतला.
कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेतर्फे तसेच योगाभ्यासाचा अभ्यास करणाऱ्या अनेकांनी आगाशे यांना शुभेच्छा दिल्या.
रत्नागिरी: योगाभ्यासामध्ये आत्महत्येपासूनही परावृत्त करण्याची शक्ती – रमाताई जोग
