संगमेश्वर: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज’ अभियानाअंतर्गत, ग्रुप ग्रामपंचायत आंबेड बुद्रुक येथे बुधवार, १७ सप्टेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला गावातील १६१ ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात उपस्थिती लावत अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार केला.
या विशेष ग्रामसभेला जिल्हा परिषद रत्नागिरीच्यावतीने नियुक्त करण्यात आलेले मार्गदर्शक, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. उत्तम सुर्वे, तसेच पंचायत समिती संगमेश्वरचे विस्तार अधिकारी श्री. पंकज निकम यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी ग्रामस्थांना अभियानाचे महत्त्व आणि उद्दिष्टे समजावून सांगितली. या अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामपंचायतींना स्वावलंबी बनवणे, त्यांच्या कामकाजात सुधारणा करणे आणि ग्रामीण विकासाला गती देणे हा आहे. यासाठी विविध निकषांवर ग्रामपंचायतींचे मूल्यांकन केले जाते आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना विशेष पुरस्कार दिले जातात.
या अभियानातील स्पर्धेत सक्रिय सहभाग घेऊन, सर्व निकष पूर्ण करून, शासनाने घोषित केलेले पहिले पारितोषिक आंबेड बुद्रुक ग्रामपंचायतीला मिळवून देण्याचा निर्धार ग्रामसभेत एकमताने करण्यात आला. गावाचे नाव राज्यात उंचावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची शपथ यावेळी उपस्थितांनी घेतली.
या ग्रामसभेला ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, केंद्र प्रमुख, सर्व मुख्याध्यापक, सीआरपी, ग्रामसंघ अध्यक्ष, अंगणवाडी सेविका, आशासेविका, सर्व वाडी प्रमुख आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांनी मिळून गावाच्या विकासासाठी आणि अभियानाच्या यशस्वीतेसाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले. ही सभा केवळ एका अभियानापुरती मर्यादित नसून, गावाच्या उज्ज्वल भवितव्याची पायाभरणी करणारी ठरली, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.