अलिबाग : जिल्हा रुग्णालयात प्रसूती दरम्यान नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी तब्बल तीन वर्षांनंतर महत्त्वाची कारवाई करण्यात आली असून, सर जे.जे. समूह रुग्णालय येथील पाच सदस्यीय तज्ज्ञ समितीने कर्तव्यातील हलगर्जीपणा आणि वैद्यकीय निष्काळजीपणा स्पष्ट केल्यानंतर डॉ. प्रियल रवींद्र शेंडे यांच्याविरुद्ध अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेलोशी येथील सुष्मिता रुपेश काटले यांना १४ मे २०२२ रोजी प्रसूतीसाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
प्रसूतीदरम्यान गुंतागुंत निर्माण झाल्यानंतर ऑनड्युटी डॉक्टरांना पाचारण करण्यात आले होते; मात्र संबंधित डॉक्टर रुग्णालयात उपस्थित नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. बाळाचे डोके प्रसूतीमार्गात अडकल्यानंतर वेळेत आवश्यक उपचार न मिळाल्याने नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. घटनेनंतर आकस्मिक मृत्यूची नोंद करून प्रकरणातील वैद्यकीय कागदपत्रे जे.जे. रुग्णालयाच्या तज्ज्ञ समितीकडे पाठविण्यात आली होती. या समितीचा अहवाल २७ जुलै २०२६ रोजी अलिबाग पोलिसांना प्राप्त झाला असून, अहवालात प्रसूतीसारख्या गंभीर परिस्थितीत संबंधित डॉक्टरांचे कर्तव्यावर उपस्थित राहणे आवश्यक असतानाही त्या अनुपस्थित असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
या निष्कर्षांच्या आधारे पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला आहे. पीडित माता सुष्मिता काटले यांनी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टर, अलिबाग पोलीस आणि जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांचे मनःपूर्वक आभार मानले असून, भविष्यात कोणत्याही आईवर अशी दुर्दैवी वेळ येऊ नये, यासाठी वैद्यकीय हलगर्जीपणाविरोधात कठोर कारवाईची गरज असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सामाजिक कार्यकर्ते ॲड. राकेश नारायण पाटील यांनीही अशा प्रकरणांतील दोषींवर कठोर कारवाई होणे अत्यंत आवश्यक असल्याचे आपले मत व्यक्त केले आहे.






