ज्येष्ठ नागरिक व महिलांना सवलत; एसटी विभागाचे अधिक बुकिंगचे आवाहन
रत्नागिरी: आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो भाविक आणि वारकऱ्यांसाठी रत्नागिरी एसटी विभागाने विशेष नियोजन केले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातून २३ एसटी गाड्या पंढरपूरसाठी आरक्षित झाल्या असून, ३ जुलैपासून रत्नागिरीसह विविध आगारांतून या बसेस पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहेत. आषाढी एकादशी जवळ आल्याने, उर्वरित भाविकांनी जास्तीत जास्त आरक्षण करावे, असे आवाहन एसटी विभागाकडून करण्यात आले आहे.
आषाढी वारी काही दिवसांवर येऊन ठेपल्याने अनेक वारकरी आणि भाविक ऊन, वारा, पावसाच्या सरी झेलत पायी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. ‘विठुनामाचा गजर’ करत लाखो भाविक पंढरपूरला जात असताना, ज्यांना पायी जाणे शक्य नाही, त्यांच्यासाठी एसटी महामंडळाने सुलभ प्रवासाची सोय केली आहे. आतापर्यंत २३ बस आरक्षित झाल्या असल्या तरी, येत्या काही दिवसांत ही संख्या ३० ते ३५ पर्यंत पोहोचण्याची शक्यता एसटी विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. मागील वर्षी रत्नागिरी जिल्ह्यातून ३० एसटी बसेस पंढरपूरला धावल्या होत्या. रत्नागिरीतील अनेक भाविक खासगी बसेस किंवा सायकलवारी करूनही विठुरायाचे दर्शन घेतात.
ज्येष्ठ नागरिक व महिलांना विशेष सवलत
एसटी महामंडळाने आषाढी वारीसाठी यंदाही प्रवाशांना सवलती दिल्या आहेत. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास पूर्णपणे मोफत असणार आहे, तर महिला आणि ६५ वर्षांवरील नागरिकांसाठी अर्धे तिकीट आकारले जाईल. प्रवाशांनी या सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी विभागाने केले आहे.
या संदर्भात बोलताना रत्नागिरीचे विभागीय नियंत्रक प्रज्ञेश बोरसे म्हणाले, “आषाढी एकादशी येत्या ६ जुलैला आहे. त्यामुळे लाखो भाविक पंढरपूरला जातात. यंदाच्या वर्षी एसटी विभागाकडून एसटीचे नियोजन केले आहे. आतापर्यंत लांजासह विविध तालुक्यांतून २३ एसटी बसचे बुकिंग झाले आहे. आणखी काही दिवसांत एसटी बुकिंग वाढण्याची शक्यता आहे. ३ जुलै रोजी रत्नागिरीसह विविध आगारांतून एसटी बसेस पंढरपूरकडे रवाना होतील.”
ज्या भाविकांना पंढरपूरला जायचे असेल, त्यांनी त्वरित एसटी आरक्षण करून आपल्या प्रवासाची सोय करावी, असे आवाहन एसटी विभागाने पुन्हा एकदा केले आहे.