संगमेश्वर / प्रतिनिधी :संगमेश्वर तालुक्यातील नावडी येथील पोस्ट आळीचे सुपुत्र आणि ‘पुष्पांजली पेंटिंग्स’ या नावाने कार्यरत असलेले ज्येष्ठ चित्रकार व कलाप्रेमी कै. श्री. ऋषिकांत भिकाजी शिवलकर यांचे वयाच्या ८० व्या वर्षी अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने नावडी परिसरात कला आणि अध्यात्मिक सेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले असून, त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कै. ऋषिकांत शिवलकर यांचा जन्म १७ सप्टेंबर १९४८ रोजी संगमेश्वर येथे झाला. त्यांचे वडील कै. भिकाजी शिवलकर हे पानाचा व्यापार करत असल्याने, घरच्या साध्या आर्थिक परिस्थितीमुळे ऋषिकांत यांना फारसे औपचारिक शिक्षण घेता आले नाही. मात्र, कलेची उपजत आवड असल्याने त्यांनी आपले लक्ष बोर्ड पेंटिंगकडे वळवले. चित्र रेखाटणे, नेम पेंटिंग आणि विशेषतः गणपती कलेची त्यांनी आयुष्यभर निष्ठेने जोपासना केली, तसेच उत्कृष्ट वॉलपीस बनवण्याची कला त्यांना अवगत होती. कलेच्या माध्यमातून कुटुंबाला आधार देतानाच, सन १९८४ पासून त्यांनी घरातच गणेश मूर्तींचे काम सुरू केले. या कार्यात त्यांना त्यांची सुविद्य पत्नी कै. स्मिता यांची मोलाची साथ लाभली. त्यांना चार मुली आणि मंदार व तुषार असे दोन मुलगे अशी एकूण सहा अपत्ये होती. आपल्या अथक कष्टांतून आणि परिश्रमातून त्यांनी सर्व मुलांना उच्च शिक्षण देऊन त्यांना यशस्वी केले.
शिवलकर हे दत्तभक्त व गजानन महाराजांचे निस्सीम अनुयायी होते. या श्रद्धेतूनच त्यांनी सन १९९४ साली पोस्ट आळीतील एका मोठ्या उंबराच्या वृक्षाखाली श्री दत्त महाराजांना स्थानापन्न केले. पुढे काही वर्षांनी त्यांनी या स्थानाचे सुबक व आकर्षक मंदिरात रूपांतर केले. यासोबतच, त्यांनी गेली अनेक वर्षे साई गजानन मंदिरात सदस्य म्हणून निःस्वार्थ सेवाभाव जपला. संगमेश्वर येथील श्री निनावी आईच्या देवळातील मूर्ती रंगवण्याचे तसेच देवळाबाहेरील नंदी रंगवण्याचे अत्यंत महत्त्वाचे आणि उत्तम सेवाकार्य त्यांनी बजावले.
‘पुष्पांजली पेंटिंग्स’ या नावाने ते कार्यरत होते. त्यांच्या प्रेमळ, मिश्किल आणि मनमिळाऊ स्वभावामुळे ते कुटुंबात, तसेच जावई, पाहुणे मंडळी व संपूर्ण जनतेत अत्यंत लोकप्रिय होते. कला आणि समाजकार्यात मग्न असलेले हे प्रेरणादायी, समाजप्रिय व्यक्तिमत्त्व वृद्धापकाळाने राहत्या घरी आजारी होते. अशाप्रकारे अल्पशा आजाराने ‘कलारत्न’ ऋषिकांत शिवलकर काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांच्या पश्चात शिक्षक मंदार शिवलकर व तुषार शिवलकर हे दोन मुलगे, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती मिळावी यासाठी त्यांच्या चाहत्यांकडून ही ‘सुमानंजली’ अर्पण करण्यात येत आहे.