GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग: हातखंबा येथे दोन अपघातात एक ठार, एक गंभीर

Gramin Search
34 Views

समीर शिगवण /रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा परिसरात आज सकाळी १०.३० ते ११ वाजण्याच्या सुमारास झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी घटनांमध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे.

पहिला अपघात हातखंबा गावात सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडला. एका भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत मंगेश मधुकर भस्मे (वय ४२, रा. पाली, ता. रत्नागिरी) यांचा जागीच मृत्यू झाला. मंगेश भस्मे हे पाली येथून रत्नागिरीकडे कामानिमित्त दुचाकीवरून जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे पाली गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या दुचाकीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. यावरून अपघाताची भीषणता दिसून येते.

त्यापाठोपाठ, हातखंबा येथील झरेवाडी फाट्याजवळ सकाळी ११ वाजताच्या सुमारास दुसरा अपघात घडला. या अपघातात एका ट्रकच्या मागील चाकात दुचाकीस्वार थेट घुसला. या घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते, परंतु या अपघाताने महामार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असतानाही अपघातांची वाढती संख्या चिंताजनक असून, वाहनचालकांनी अधिक सावधगिरी बाळगावी आणि वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे. पोलीस या दोन्ही अपघातांचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

2650865
Share This Article