GRAMIN SEARCH BANNER

अकरावी प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक त्रुटींमुळे गुणवत्ताधारक विद्यार्थी वंचित; तातडीने सुधारणा कराव्यात : अ‍ॅड. निरंजन डावखरे

राजन लाड / जैतापूर  : अकरावी प्रवेश प्रक्रियेत सुरू असलेल्या तांत्रिक व प्रशासनिक त्रुटींमुळे उच्च गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्याची गंभीर बाब विधान परिषदेचे आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

डावखरे यांनी नमूद केले की, ओपन कॅटेगरीतील ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेले विद्यार्थी अद्याप प्रवेशापासून वंचित आहेत. नामांकित महाविद्यालयांत जागा उपलब्ध असूनही यादीत त्यांचा समावेश नाही. सायन्स शाखेत तिसऱ्या फेरीअखेर १८९ जागा रिक्त असून चौथ्या फेरीत फक्त ३ विद्यार्थ्यांची नावे जाहीर झाली. कॉमर्स शाखेतही जागा असूनही यादी चुकीची तयार होत आहे.

पाचव्या ‘ओपन टू ऑल’ फेरीत कमी गुणांच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला, मात्र उच्च गुणवत्ताधारक विद्यार्थी अद्याप बाहेर आहेत. यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम, अस्वस्थता आणि भीती निर्माण झाली असून शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

ही बाब रत्नागिरीतील सामाजिक कार्यकर्ते राजू भाटलेकर यांनी डावखरे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. डावखरे यांनी शिक्षणमंत्र्यांना तातडीने चौकशी करून तांत्रिक अडचणी दूर करण्याची, सुधारणा करण्याची आणि सर्व पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्याची मागणी केली आहे.

Total Visitor Counter

2455917
Share This Article