तन्मय दाते/रत्नागिरी: कोकणातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या गणपतीपुळे येथे उद्या (मंगळवार) अंगारकी संकष्टी निमित्त भाविकांची प्रचंड गर्दी अपेक्षित आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त उभारला असून, परिसराला अक्षरशः छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
सकाळपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांची रांग मंदिरे, समुद्रकिनारा आणि आसपासच्या परिसरात उसळण्याची शक्यता लक्षात घेऊन १४ पोलीस अधिकारी आणि १४० पोलीस अंमलदार अशी मजबूत फौज तैनात करण्यात आली आहे. वाहतूक नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन आणि आपत्कालीन परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथकेही कार्यरत राहणार आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर आणि जयगड पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांनी स्वतः गणपतीपुळे येथे भेट देऊन बंदोबस्ताचा आढावा घेतला. भाविकांच्या सुरळीत दर्शनासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, गणपतीपुळे देवस्थान समितीनेही भाविकांसाठी विशेष व्यवस्था केली आहे. दर्शन रांगेत शिस्त राखण्यासाठी स्वयंसेवक, पिण्याच्या पाण्याची सोय, वैद्यकीय मदत केंद्र, तसेच वयोवृद्ध व दिव्यांगांसाठी स्वतंत्र रांगा अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पोलिसांचा बंदोबस्त आणि देवस्थानच्या चोख व्यवस्थेमुळे भाविकांना सुरक्षित आणि समाधानकारक दर्शनाचा अनुभव मिळणार आहे.
गणपतीपुळे येथे अंगारकी संकष्टीला कडेकोट पोलिस बंदोबस्त; परिसराला छावणीचे स्वरूप
