रत्नागिरी : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रत्नागिरी जिल्ह्याला एक नवीन जिल्हा संसाधन व्यक्ती (DRP) मिळाली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी यांच्या कार्यालयाने १६ जून २०२५ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, सौ. अन्वी महेंद्र घुग यांची या महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
कृषी उद्योग भवन, मिरजोळे येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्याधिकाऱ्यांच्या २ जून २०२५ रोजीच्या मंजूर टिपणीनुसार, सौ. अन्वी घुग यांच्या बायोडेटा आणि मुलाखतीतील कामगिरीची दखल घेऊन त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे.
सौ. घुग यांच्यावर या योजनेंतर्गत वैयक्तिक आणि गट सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजकांना विविध पातळ्यांवर मदत करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामध्ये ऑनलाइन पोर्टलवर (htpps://pmfme.mofi.gov.in) नोंदणी करणे, अर्ज भरणे, सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करणे, बँक कर्ज मिळवण्यासाठी सहाय्य करणे, तसेच उद्योग आधार, फूड लायसन्स (FSSAI), वस्तू व सेवा कर (GST) नोंदणी आणि इतर आवश्यक परवाने मिळवण्यासाठी मार्गदर्शन करणे यांचा समावेश आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, शिवकुमार सदाफुले यांनी या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जास्तीत जास्त प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.