राजापूर / तुषार पाचलकर: राजापूर तालुक्यातील तळवडे (बौद्धवाडी) येथील सचिन जाधव उर्फ बावा (वय ४२) या युवकाचा मृतदेह अर्जुना नदीच्या काठी पुलाजवळ गौंड चिरफळीचा माळ या परिसरात आज दुपारी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सचिन जाधव हे शनिवार, दिनांक १९ जुलै २०२५ पासून बेपत्ता होते. त्याचा शोध ग्रामस्थांसह नातेवाईकांकडून सुरू होता. मात्र, कुठलाही थांगपत्ता न लागल्याने त्याची बहीण गौतमी नंदकुमार कांबळे (रा. जुगाई, येळवण) यांनी रायपाटण पोलीस दूरक्षेत्रात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.
तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस तपास सुरू असतानाच आज सकाळी अर्जुना नदीच्या पुलाजवळील वडचाआई मंदिर परिसरात मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे व त्यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
सदर मृतदेह पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील घाडगे आणि रामदास पाटील यांनी ग्रामस्थांच्या मदतीने नदीतून बाहेर काढला. मृतदेह तब्बल तीन दिवस पाण्यात असल्याने तो पूर्णतः कुजलेल्या अवस्थेत होता. त्यानंतर रायपाटण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पंदरीकर व त्यांच्या टीमने घटनास्थळी येऊन मृतदेहाचे पोस्टमॉर्टेम केले.
या प्रकरणाचा पुढील तपास रायपाटण पोलीस दूरक्षेत्राचे अधिकारी कमलाकर पाटील करीत आहेत. मृत्यूचे कारण स्पष्ट होण्यासाठी अधिक तपास सुरू असून, अपघात, आत्महत्या की घातपात, याचा छडा लावण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.
तळवडे येथील बेपत्ता युवकाचा मृतदेह अर्जुना नदीत आढळला; तीन दिवसांपासून होता बेपत्ता
