GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग: रत्नागिरी चर्मालय येथे भीषण अपघात ; २१ वर्षीय तरुण जागीच ठार

रत्नागिरी – रत्नागिरी शहरात आज संध्याकाळी एक दुःखद घटना घडली. चर्मालयजवळ झालेल्या भीषण अपघातात डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने मयूर घडशी (वय २१, रा. शिरगाव तिवेंडेवाडी) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मित्र ओंकार सनगरे (वय २२) गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही घटना संध्याकाळी ७ च्या सुमारास घडली. मयत मयूर आणि जखमी ओंकार हे दोघे मित्र दुचाकीवरून डीमार्ट येथे काही खरेदी करण्यासाठी जात होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या भरधाव वेगातील डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की दुचाकीचा चक्काचूर झाला. मयूरला वाचवण्याची संधीही मिळाली नाही आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी ओंकारला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून, डंपर चालकाचा शोध सुरू आहे.

या घटनेमुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे. मयूरच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शहरात वाढणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली असून, यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Total Visitor Counter

2475428
Share This Article