GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी प्रभाग १० मध्ये प्रचाराला वेग, पुन्हा निवडणुकीचे वातावरण

रत्नागिरी : निवडणूक आयोगाने स्थगिती दिलेल्या शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये आता प्रचाराला चांगलाच वेग आला असून महायुती आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटीगाठी सुरू केल्या आहेत. त्यामुळे रत्नागिरी शहरात पुन्हा एकदा निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले आहे. महायुतीकडून या प्रभागात तिसऱ्या फेरीचा प्रचार सुरू असून महाविकास आघाडीनेही वैयक्तिक संपर्कावर भर दिला आहे.

तांत्रिक कारणांमुळे प्रभाग क्रमांक १० मधील निवडणूक २० डिसेंबर रोजी होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून युती आणि आघाडीचे उमेदवार तसेच पदाधिकारी प्रचारात सक्रिय झाले आहेत. महायुतीने प्रभाग १० मध्ये विठ्ठल मंदिर परिसरातून प्रचाराची सुरुवात केली असून यावेळी महायुतीचे स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुरुवारी पुन्हा प्रचाराला सुरुवात करण्यात आली.

महायुतीकडून भाजपचे उमेदवार राजू तोडणकर आणि मानसी करमरकर हे निवडणूक रिंगणात आहेत, तर महाविकास आघाडीकडून राजाराम रहाटे आणि श्वेता कोरगावकर हे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, प्रभाग क्रमांक १० मधील अपक्ष उमेदवार सचिन शिंदे आणि संपदा रसाळ-राणा यांचे उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तसेच जिल्हा न्यायालयाने अवैध ठरवले आहेत. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांनी उच्च न्यायालयात दाद मागितली असून त्याबाबतचा निर्णय अद्याप प्राप्त झालेला नाही.

या पार्श्वभूमीवर निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार असून अंतिम टप्प्यात प्रचार अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Total Visitor Counter

3483439
Share This Article