संगमेश्वर : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर धामणी येथील पंपाजवळ मंगळवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात गायीचा मृत्यू झाला असून दुचाकीवरील दोघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रात्री सुमारे आठच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश रामदास चव्हाण (वय ३०) आणि रोहित मोहन चव्हाण (वय २५), दोघेही मूळ सातारा जिल्ह्यातील असून सध्या वांद्री येथे वास्तव्यास आहेत. हे दोघे दुचाकीवरून संगमेश्वरच्या दिशेने येत असताना अचानक रस्त्यावर गाय आडवी आली. त्यामुळे दुचाकीचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून दुचाकी थेट गाईला धडकली.
धडक एवढी जोरदार होती की गाय काही अंतरावर फेकली जाऊन जागीच ठार झाली, तर दुचाकीवरील दोघे तरुण गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ जखमींना मदत केली व रुग्णवाहिकेतून संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस हेडकॉन्स्टेबल विनय मनवल आणि पोलीस कॉन्स्टेबल लोखंडे घटनास्थळी दाखल झाले. जखमींपैकी एका तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन कानातून रक्तस्त्राव झाल्याचे, तर दुसऱ्यालाही गंभीर जखमा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयातील डॉ. रिशप सिंग यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर दोघांनाही पुढील उपचारासाठी रत्नागिरी शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
संगमेश्वर : धामणी येथे दुचाकीच्या जोरदार धडकेत गायीचा मृत्यू ; दोघे तरुण गंभीर






