GRAMIN SEARCH BANNER

बोटींची तपासणी करा आणि अंमली पदार्थांच्या तस्करीवर अंकुश लावा; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे कडक निर्देश

Gramin Varta
154 Views


रत्नागिरी: मत्स्यव्यवसाय आणि बंदर विभागाने समुद्रकिनाऱ्यावरील संशयास्पद बोटींची कसून तपासणी करावी, तसेच अन्न व औषध प्रशासनाने वैद्यकीय दुकानांमधून प्रतिबंधित औषधांची विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित नार्को को-ओर्डीनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी जिंदल यांनी सांगितले की, मच्छीमार बोटींवर काम करणाऱ्या नेपाळी कामगारांकडून अंमली पदार्थांचे सेवन केल्यामुळे काही अपघात घडले आहेत, त्यामुळे या पदार्थांचा नेमका स्त्रोत शोधणे आवश्यक आहे. यासाठी स्थानिक मच्छीमारांचे सहकार्य घेऊन पोलिसांनी आपले गोपनीय नेटवर्क अधिक मजबूत करावे आणि गस्त वाढवावी. प्रलंबित असणारी तडीपारीची प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
केवळ कारवाईवर न थांबता समाजात जनजागृती होणे गरजेचे असल्याचे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन मोहीम राबवण्याचे आदेश दिले. तसेच कृषी आणि वन विभागाने गांजाची अवैध लागवड होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. अंमली पदार्थांच्या विरोधात सर्वांनी ‘अलर्ट मोड’वर राहून जास्तीत जास्त कारवाया कराव्यात, जेणेकरून जिल्हा नशामुक्त राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी यावेळी जिल्ह्यातील सद्यस्थितीचा सविस्तर आढावा सादर केला.

Total Visitor Counter

3367004
Share This Article