संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील घाटीवळे रेल्वे बोगद्यात मंगला एक्स्प्रेसच्या धडकेत एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. मृत व्यक्तीचे नाव सीताराम भिवा दरडे (वय ७०, रा. आडवली-वाक, ता. लांजा) असे आहे.
देवरुख पोलीस ठाण्याने दिलेल्या माहितीनुसार, सीताराम दरडे हे गुरुवारी दुपारी सुमारे तीन वाजता वाडीकडून घाटीवळे रेल्वे ट्रॅक ओलांडत होते. त्याचवेळी रत्नागिरीकडून येणाऱ्या मंगळा एक्स्प्रेसने त्यांना बोगद्यात जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांच्यासोबत पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत मसूरकर, सचिन कामेरकर, एस. एस. पंदेरे, संजय कारंडे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल रेणुका कांबळे हे देखील उपस्थित होते.
दरडे यांनी आपल्या गावाचे नाव असलेला टी-शर्ट परिधान केला होता. त्यावरून त्यांची ओळख पटली. मृतदेह देवळे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला. तेथे शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, रेल्वे ट्रॅक ओलांडताना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
मंगला एक्स्प्रेसची धडक बसून घाटीवळेत वृद्धाचा मृत्यू
