GRAMIN SEARCH BANNER

गृहराज्यमंत्री यांच्या आदेशानंतरही पुणे पोलिसांचा ठाम निर्णय; सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्यास नकार

Gramin Varta
5 Views

पुणे: शहरातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना देण्यास पुणेपोलिसांनी नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, गृहराज्यमंत्री यांच्या आदेशानंतरही पुणे पोलिसांनी परवाना देण्यास नकार देत आदेश “होल्ड” ठेवला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन घायवळविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच पार्श्वभूमीवर २० जानेवारी रोजी पुणे पोलिसांनी त्याचा शस्त्र परवाना अर्ज नाकारला होता. त्यानंतर २६ जून रोजी गृहराज्यमंत्री यांच्या आदेशानुसार शासनाने परवानगीचा आदेश दिला, मात्र स्थानिक पोलिसांनी त्यावर कायदेशीर आणि सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय “होल्ड” ठेवला.

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सचिन घायवळविरुद्धचे गुन्हे अजूनही न्यायप्रविष्ट असून, अशा व्यक्तीस शस्त्र परवाना दिल्यास कायद्याची व सार्वजनिक सुरक्षेची परिस्थिती धोक्यात येऊ शकते. त्यामुळे वरिष्ठ स्तरावर चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते.

दरम्यान, या प्रकरणामुळे पुन्हा एकदा गुन्हेगारांच्या शस्त्र परवान्यांबाबतच्या राजकीय हस्तक्षेपावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गृहराज्यमंत्रींच्या आदेशानंतरही पुणे पोलिसांनी न जुमानता निर्णय “होल्ड” ठेवल्याने पोलिस प्रशासनाने कायद्याच्या चौकटीत ठाम भूमिका घेतली असल्याचे मानले जात आहे.”

Total Visitor Counter

2648025
Share This Article