रत्नागिरी: महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथील प्रसिद्ध स्वयंभू गणपती मंदिरात आता देवदर्शनासाठी येणाऱ्या भक्त आणि पर्यटकांसाठी लवकरच भारतीय हिंदू संस्कृतीला साजेसा पेहराव (ड्रेसकोड) लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती देवस्थानचे सरपंच डॉ. श्रीराम केळकर यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील इतर प्रमुख देवस्थानांच्या धर्तीवर गणपतीपुळे मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे. सध्या या ड्रेसकोडबाबत भक्त आणि पर्यटकांमध्ये प्रबोधन करण्यासाठी मंदिर परिसरात माहिती फलक लावण्यात आले आहेत.
या फलकांमध्ये भक्त आणि पर्यटक बंधू-भगिनींना आवाहन करण्यात आले आहे की, “आपण गणपतीपुळे या धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी आला आहात. स्वयंभू गणेशाच्या आशीर्वादाने आपले कार्य सिद्धीस जाते. तरी दर्शनाला येणाऱ्या सर्वांनी मंदिर परिसरात वावरताना आपला पेहराव हा आपल्या भारतीय हिंदू परंपरेला साजेसा, सुसंस्कृत व शुचिर्भूत असावा, जेणेकरून आपल्या देवतेचे दर्शन करायला जाताना परिसरातील वातावरण, सांस्कृतिक वारसा व परिसराचे पावित्र्य टिकवणारा असेल.”
तसेच, “अंगभर वस्त्र परिधान करून देवदर्शन घ्यावे, जेणेकरून आपल्यासोबत असणाऱ्या असंख्य भाविकांना संकोचल्यासारखे वाटणार नाही व त्यांच्या चित्तवृत्ती विचलित होणार नाहीत. नियम, कायदे यापेक्षा स्वयंप्रेरणेने केलेले वर्तन हे नेहमी समाजासाठी उपकारक असते,” अशा प्रकारचे प्रबोधनपर संदेश या फलकांवर आहेत.
डॉ. श्रीराम केळकर यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील इतर प्रमुख देवस्थानांप्रमाणे गणपतीपुळे मंदिरातही भक्त व पर्यटकांसाठी ड्रेसकोड लागू करण्याकरिता गणपतीपुळे पंच कमिटीची एक विशेष बैठक लवकरच आयोजित केली जाईल. त्या बैठकीमध्ये योग्य तो निर्णय व ठराव मंजूर झाल्यानंतरच ड्रेसकोडची अंमलबजावणी सुरू केली जाईल.
तत्पूर्वी, मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या प्रबोधनपर माहिती फलकांच्या सूचना लक्षात घेऊन गणपती मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भक्त व पर्यटकांनी आपल्या हिंदू संस्कृतीला साजेसा पेहराव करून देवदर्शन घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.