देवरुख: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देवरुख शहरातील गरजू महिला भगिनींना लवकरात लवकर आणि सुलभतेने मिळावा, यासाठी गाव विकास समिती, देवरुख विभागाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. समितीच्या वतीने देवरुख शहरातील महिलांसाठी ‘लाडकी बहीण योजना’ या महत्त्वाकांक्षी योजनेची मोफत ई-केवायसी (e-KYC) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक लाभार्थी महिलेने पुढील महिन्याच्या आत ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे देवरुख शहर गाव विकास समितीने हा सामाजिक उपक्रम राबवून महिलांना मोठा दिलासा दिला आहे. या सुविधेमुळे महिलांना ई-केवायसी करण्यासाठी इतरत्र पैसे खर्च करावे लागणार नाहीत.
ही मोफत ई-केवायसी सुविधा देवरुख पोलीस स्टेशनसमोर, दैवत इंटरप्राईजेस, देवरुख या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड,संघटन प्रमुख सुहास खंडागळे,राहुल यादव,मंगेश धावडे व श्याम कर्ण भोपळकर यांच्या मार्गदर्शनाखाली 20 ऑक्टोबर पर्यंत ही सुविधा संगमेश्वर तालुक्यातील महिलांसाठी गाव विकास समितीच्या माध्यमातून मोफत राहील.
सौ. अनघा कांगणे आणि सौ. दीक्षा खंडागळे-गिते यांच्या पुढाकाराने गाव विकास समिती, देवरुख शहर या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करत आहे.
योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व महिला भगिनींनी या संधीचा फायदा घेऊन त्वरित आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन गाव विकास समिती, देवरुख शहर यांच्या वतीने करण्यात आले आहे. महिलांच्या सोयीसाठी आणि योजनेचा लाभ तात्काळ मिळवण्यासाठी उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे.
‘लाडकी बहीण’ योजनेसाठी गाव विकास समितीतर्फे मोफत ई-केवायसी सुविधा
