रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): सध्या सर्वत्र निवडणुकांचे वारे वाहत असतानाच, गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी एका मार्मिक व्यंगचित्राद्वारे मतदारांना अंतर्मुख करायला लावणारा प्रश्न विचारला आहे. ‘जंगल निवडणुकी’चे उदाहरण देत त्यांनी पैशाच्या जोरावर निवडणूक लढवणाऱ्या धनदांडग्यांवर आणि त्यांना बळी पडणाऱ्या मतदारांवर सडकून टीका केली आहे.
काय आहे ‘जंगल निवडणुकी’चे रूपक?
सुहास खंडागळे यांनी शेअर केलेल्या या व्यंगचित्रात जंगलातील निवडणुकीचे दृश्य दाखवण्यात आले आहे. यामध्ये हरणांचे रक्षण करण्यासाठी एक ‘हुशार हरिण’ उमेदवार म्हणून उभे असताना, दुसरीकडे एक ताकदवान ‘सिंह’ देखील उमेदवार आहे. मात्र, जंगलातील इतर हरणे (मतदार) आपल्यातीलच हुशार हरणाला सोडून, ताकदवान नेतृत्वाच्या नादात सिंहाला मत देताना दिसत आहेत.
यावर भाष्य करताना खंडागळे म्हणतात की, ‘जर हरणांनी ताकदवान सिंहाला आपला रक्षक म्हणून निवडून दिले, तर हरणांचे रक्षण होईल की घोषणा देणारी ती हरणे सिंहाचे भक्षक होतील?’ हे रूपक वापरून त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोट ठेवले आहे.
मतदारांना कानपिचक्या
आपल्या फेसबुक पोस्टमधून सुहास खंडागळे यांनी मतदारांना खडे बोल सुनावले आहेत. ते म्हणतात, ‘धनाढ्य लोकांकडून पैसे घेऊन मत विकणाऱ्या सामान्य माणसाने या कार्टूनमधून बोध घ्यावा. प्रश्न जर तुमचे आहेत, तर तुम्हाला तुमच्यातील उमेदवार निवडावा लागेल.’
पैसेवाला तुमचं भलं करणार नाही
यावेळी त्यांनी धनशक्तीचा वापर करणाऱ्या उमेदवारांवर जोरदार हल्ला चढवला. “पैसेवाला तुमचं भलं करेल हे या जन्मात शक्य नाही. मतांसाठी पैसे देणारे हे तुमच्या विकासाचे विरोधक आहेत,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे. मतदारांनी वेळीच जागे व्हावे आणि आपला खरा प्रतिनिधी ओळखावा, असे आवाहन गाव विकास समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
सुहास खंडागळे यांच्या या पोस्टमुळे सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली असून, मतदारांना विचार करण्यास भाग पाडले जात आहे.





