कणकवली : कणकवली तेलीआळी- हर्णे आळी येथील सुदर्शन मित्रमंडळाच्यावतीने आयोजित नरकासूर स्पर्धेत वरवडे,फणसनगर येथील सद्गुरु मित्रमंडळ प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. कणकवली तेलीआळी डी.पी.रोड कॉर्नर येथे संत जगनाडे महाराज चौकात नरकचतुर्दशीच्या पूर्वसंध्येला नरकासूर स्पर्धेचे आयोजन कणकवली येथील सुदर्शन मित्रमंडळच्यावतीने करण्यात आले होते.
या स्पर्धेत २० संघ सहभागी झाले होते.या संघांनी नरकासूराची प्रतिकृती पौराणिक कथेनुरूप सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. अनेक प्रतिकृती लक्षवेधी ठरल्या.
या नरकासूर स्पर्धेत द्वितीय क्रमांक सुदर्शन मित्रमंडळ, कणकवली व भगवती मित्रमंडळ, आंब्रड यांना विभागून देण्यात आला. तर तृतीय क्रमांक कणकवली येथील पटकीदेवी मित्र मंडळ व स्वराज्य मित्रमंडळ, जळकेवाडी, कणकवली यांना देण्यात झाला. उत्तेजनार्थ पारितोषिक दत्तमंदिर मित्रमंडळ परबवाडी, श्री स्वयंभू मित्रमंडळ, कणकवली, जागृत मित्रमंडळ, नवयुग मित्रमंडळ यांना देण्यात आले. तसेच प्रत्येक सहभागी संघाना चषक व रोख ५०० रूपये देवून गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून गजानन उपरकर, प्रा. हरिभाऊ भिसे व सुधिर हर्णे यांनी काम पाहिले.
लक्षवेधी, डोळ्याचे पारणे फेडणारे सादरीकरण
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सुदर्शन मित्र मंडळाच्या सर्व कार्यकत्यांनी विशेष मेहनत घेऊन स्पर्धा यशस्वी केली. रात्री उशिरापर्यंत ही स्पर्धा रंगली होती. नरकासुर पाहण्यासाठी नागरिकांनी तेली आळी येथे गर्दी केली होती. ढोल ताशांच्या गजरात नरकासुरांची धिंड काढण्यात आली. विविध संघांनी आपण तयार केलेल्या नरकासूराच्या प्रतिकृती वाजत,गाजत स्पर्धेच्या ठिकाणी आणल्या. तसेच श्रीकृष्णाच्या विविध लीलांचे सादरीकरण करण्यात आले. दशावतार नाट्यकृतींचा आधारही नरकासुर वधाचे कथानक सादर करताना घेण्यात आला. त्यामुळे ते लक्षवेधी ठरले. संदेश तांबे यांनी स्पर्धेचे सूत्रसंचालन केले.
नरकासुरवधाचे स्पर्धात्मक सादरीकरण, फणसनगर येथील सद्गुरु मित्रमंडळ प्रथम क्रमांकाचे मानकरी
