राजापूर: राजापूर शहरात सांडपाण्याची योग्य विल्हेवाट न लावल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या एका व्यक्तीवर राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजापूर नगरपरिषदेचे कर्मचारी राजन रामचंद्र जाधव (वय ५५, रा. पन्हळे जाधववाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फजल फारुख डोसाणी (रा. फारुक रेसिडेन्सी, राजापूर) याच्यावर भारतीय दंड संहिता कायदा २०२३ (बीएनएस), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कायदा (एम.पी.सी.सी.) आणि महाराष्ट्र नगरपालिका, औद्योगिक नागरिक कायदा १९६५ च्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी फजल फारुख डोसाणी याने त्याच्या मालमत्तेमधील सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली नाही. याबाबत राजापूर नगरपरिषदेने त्याला वारंवार नोटीस बजावूनही त्याने या गंभीर समस्येकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले. दि. २३/०५/२०२५ पासून ते दि. २१/१०/२०२५ या कालावधीत ही समस्या कायम राहिली. श्री मुस्ताफ अब्दुल लतीफ इसफ यांच्या घराशेजारी सांडपाणी साचल्यामुळे परिसरात सर्वत्र तीव्र दुर्गंधी पसरली असून, यामुळे मुस्ताफ इसफ आणि त्यांच्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित वातावरणामुळे रोगाचा संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे.
या गंभीर उपद्रवाची दखल घेत, राजापूर नगरपरिषदेत मुकादम पदावर कार्यरत असलेले राजन जाधव यांनी दि. २१/१०/२०२५ रोजी दुपारी १.०० वाजता राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी फजल फारुख डोसाणी विरोधात भा.दं.सं. २०२३ चे कलम २७१ (जी.आर.क्र. १९८/२०२५), महा. पी.सी.सी. चे कलम ११५, तसेच महाराष्ट्र नगरपालिका, औद्योगिक नागरिक कायदा १९६५ चे कलम २२९ आणि २३० नुसार गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्या या बेजबाबदार कृतीबद्दल त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे. राजापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.