खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात भोगाव गावच्या हद्दीत पुन्हा एकदा रस्ता खोल खचला असून त्यावर दरडही कोसळली आहे. २००५ सालापासून या भागात रस्ता खचण्याचे आणि दरड कोसळण्याचे प्रमाण कायम असून, स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अतिवृष्टीमुळे या ठिकाणी वारंवार रस्ता खचत असल्याने प्रवाशांना तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागत आहे. बांधकाम विभाग आणि प्रशासनाकडून वेळोवेळी तात्पुरत्या दुरुस्तीचे काम झाले तरी मूळ प्रश्न कायम आहे. गेल्या जुलै महिन्यात तहसीलदारांनी पाहणी करून दुरुस्तीचे आदेश दिले होते, मात्र प्रत्यक्षात केवळ मलमपट्टी झाल्याने स्थिती जैसे थेच आहे.
दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ता आणखी खोल खचला असून मोठमोठे दगड रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे प्रवास करणे धोकादायक बनले आहे. स्थानिक नागरिकांचा प्रश्न कायम आहे की प्रशासन एखाद्या जीवितहानीची वाट पाहत आहे का?
सन 2005 पासून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च होतात, अनेक खासदार, आमदार आणि माजी मंत्र्यांनी या ठिकाणी भेट देऊन उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. तरीही २० वर्षांपासून रस्त्याची अवस्था जैसे थे आहे. गौरी-गणपतीसारखे मोठे सण जवळ आल्याने या भागातील 26 गावांतील लोक चिंतेत आहेत. प्रशासन यावर कायमस्वरूपी तोडगा कधी काढणार? हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.