सिंधुदुर्ग: राज्यातील सर्व हौशी, प्रायोगिक कलाकार, दिग्दर्शक, लेखक,तंत्रज्ञ, संघप्रमुख संस्था प्रमुख यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी राज्यस्तरावर नव्याने गठीत झालेल्या हौशी प्रायोगिक कलावंत संघ या संघटनेच्या वतीने राज्य नाट्य स्पर्धे संदर्भातील विविध मागण्या पूर्ण करण्याचे निवेदन मुंबईतील सांस्कृतिक संचालनालय येथे संचालक श्री.बिभीषण चवरे यांना सादर केले व विस्तृत चर्चा केली. राज्य नाट्य स्पर्धेच्या संदर्भातील विविध मागण्या मान्य करण्याचे आश्वासन यावेळी संचालकांनी दिले.
या बैठकीस सलीम शेख (नागपूर), अजय धवने (चंद्रपूर), सुरेश गांगुर्डे (मुंबई), केदार सामंत (कुडाळ), मनोज डाळिंबकर (चिंचवड), वैभव सातपुते (मुंबई), इरफान मुजावर (सांगली), अश्विनी तडवळकर (सोलापूर) हे उपस्थित होते. यावेळी संचालक श्री. चवरे यांनी आपण दिलेल्या निवेदनानुसार आमचे काम सुरू असून आपण लवकरात लवकर याची या वर्षीच्या स्पर्धेपूर्वी अंमलबजावणी करू, बहुतांश मागण्या पूर्ण होतील असे आश्वासन दिले. संघटनेचे पदाधिकारी व रंगकर्मी यांनी या बैठकीत राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी सादरीकरण खर्च 6000 रु तर अंतिम फेरीसाठी 10000 रु दिले जातात तर दैनंदिन भत्ता केवळ 150 रु दिला जातो. वाढत्या महागाई नुसार सादरीकरण खर्च व दैनंदिन भत्ता यात वाढ करावी. प्राथमिक फेरीसाठी 15 हजार व अंतिम फेरीसाठी 25 हजार सादरीकरण खर्च व दैनंदिन भत्ता 500 रु देण्यात यावा,बालनाट्य, हिंदी संगीत, संस्कृत दिव्यांग बालनाट्य आदी स्पर्धा साठी सादरीकरण खर्च वाढविण्यात यावा, संगीत आणि वेशभूषा यांनाही पारितोषिक देण्यात यावे, ज्या प्रमाणे प्रथम द्वितीय नाटकाला दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश, रंगभूषा यासाठी तीन पारितोषिके देण्यात येतात तशी तृतीय क्रमांकाच्या तंत्रज्ञालाही द्यावे, अनेक केंद्रावर समन्वयकां बाबत तक्रारी सातत्याने येतात त्याचे निराकरण करावे, स्पर्धा समन्वयक नेमण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा करावी, Online पद्धतीने अर्जप्रमाणेच स्पर्धेची अनामत रक्कम देखील ऑनलाइन स्वरुपात घ्यावी, प्राथमिक व अंतिम स्पर्धेचे वेळापत्रक किमान महिनाभर अगोदर जाहीर करण्यात यावे, परीक्षक निवड लॉटरी पद्धतीत सुधारणा करावी, हिन्दीची स्पर्धा एकाच केंद्रावर घेण्यात यावी, स्पर्धेला पाठविण्या पूर्वी परीक्षकांचे एक वर्कशॉप घ्यावे,स्पर्धा संपल्यानंतरही लगेचच एका महिन्यात सर्व संघांच्या अनामत रक्कम, सादरीकरण रक्कम आणि TADA देण्यात यावे. तसेच परितोषिक वितरण देखील दोन महिन्यांच्या आत घेण्यात यावे. अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
हौशी प्रायोगिक कलावंत संघ ही संघटना राज्यस्तरावर गठीत झाली असून या संघटनेत सभासद होण्याकरिता राज्यातील कोणतेही हौशी कलावंत, तंत्रज्ञानी संपर्क साधावा असे आवाहन राज्य हौशी प्रायोगिक कलावंत संघाच्या वतीने अध्यक्ष सलीम शेख यांनी केले आहे.
राज्य नाट्य स्पर्धेच्या संदर्भातील कलाकारांच्या विविध मागण्या मान्य होणार

Leave a Comment