रत्नागिरी : रत्नागिरी येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय खुल्या तायक्वांदो स्पर्धेत ईगल तायक्वांदो सेंटरच्या खेळाडूंनी आपल्या कौशल्याची छाप पाडत पदार्पणातच घवघवीत यश संपादन केले आहे. शहरातील अभ्युदय नगर येथील नगरपरिषद बहुउद्देशीय सभागृहात प्रशिक्षण घेणाऱ्या या खेळाडूंनी विविध वयोगटात पदकांची लयलूट केली. यामध्ये क्योरोगी म्हणजेच फाईट प्रकारात पीवी गटात १४ किलो वजनाखाली आर्या रोशन ढवण हिने प्रतिस्पर्ध्यावर मात करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. सब ज्युनियर मुलींच्या ३२ किलो वजनी गटात आराध्या सागर लोखंडे हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत रौप्य पदक पटकावले.
तर नायशा मयूर कांबळे हिने पुमसे प्रकारात दुहेरी चमक दाखवत पेअरमध्ये रौप्य आणि ग्रुप प्रकारात कांस्य पदक मिळवून सेंटरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या यशस्वी खेळाडूंना ईगल तायक्वांदो सेंटरच्या मुख्य प्रशिक्षिका संकेता संदेश सावंत आणि सह प्रशिक्षिका सई संदेश सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून, युवा तायक्वांदोचे प्रमुख प्रशिक्षक राम करा व शशी रेखा करा यांचेही त्यांना विशेष तांत्रिक सहकार्य मिळाले. या यशाबद्दल दामले विद्यालय, सर्वंकष विद्यामंदिर आणि पोदार इंटरनॅशनल स्कूल या शिक्षण संस्थांसह सर्वच स्तरातून खेळाडूंचे आणि त्यांच्या प्रशिक्षकांचे विशेष अभिनंदन व कौतुक होत आहे.






