GRAMIN SEARCH BANNER

राजापूरच्या महिला गोविंदा पथकाची कौतुकास्पद कामगिरी ; राज्यस्तरीय स्पर्धेत दुसरा क्रमांक

15 ऑगस्ट रोजी पुणे येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी होणार रवाना

तुषार पाचलकर / राजापूर: गणेशोत्सवाच्या उत्साहात आणि जन्माष्टमीच्या जल्लोषात राजापूरच्या शिवशक्ती महिला गोविंदा पथकाने पुन्हा एकदा आपली कर्तृत्वाची मोहर उमटवली आहे. महाराष्ट्र राज्य गोविंदा असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय गोविंदा स्पर्धेत मुंबई येथे झुंझारवृत्ती दाखवत पथकाने कोकणचा झेंडा फडकावला. ही स्पर्धा नुकतीच मुंबई येथे झाली. 15 ऑगस्ट रोजी पुणे येथे होणाऱ्या दहीहंडी स्पर्धेसाठी हा संघ रवाना होणार आहे.

२००५ मध्ये स्थापन झालेले हे पथक गेली २० वर्षे जिद्द, मेहनत आणि यशस्वीतेच्या मंत्रावर वाटचाल करत आहे. यंदाच्या स्पर्धेत शिवशक्ती महिला पथकाने पहिल्या फेरीत ५ थर सहज रचून दुसऱ्या फेरीत उत्कृष्ट रित्या ६ थरांची मानवी मनोरे रचले. या दमदार कामगिरीच्या जोरावर त्यांनी राज्यात दुसरा क्रमांक पटकावला.

या मंडळातील सहाव्या थरावर जाणारी गोपिका ही राजापूर कोदवली येथील प्रसिद्ध मुर्तीकार विजय मांडवकर यांची सुकन्या. कु.कल्याणी मांडवकर ही गेले काही महिने दर शनिवार, रविवार मुंबईला दहिहंडीच्या सरावासाठी जात होती. या स्पर्धेसाठी गेल्या 6 महिन्यापासून आठवड्यातून दोन दिवस सर्व मुली सरावासाठी जमत होत्या. अनेक अडचणींवर मात करत खूप मेहनत घेवून गोपिकांनी स्पर्धेची तयारी केल्याचे या मंडळाचे संयोजक, प्रशिक्षक प्रतिक गुरव यांनी सांगितले. स्पर्धेच्या तयारीसाठी व्यवसायिक संदेश करंगुटकर यांनी खेळाडूंना आर्थिक पाठबळ दिले.

मुंबईमध्ये नाव केल्यानंतर शिवशक्ती महिला पथक 15 ऑगस्ट रोजी पुणे येथे दहिहंडीसाठी जाणार आहे. आणि 16 ऑगस्ट गोपाळकाच्या दिवशी यावर्षी राजापूर, आणि सिंधुदुर्ग येथे या पथकाचे आगमन होणार आहे असे मंडळाच्या अध्यक्षा सौ.आर्या करंगुटकर यांनी सांगितले.

संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व गोपिका, प्रशिक्षक आणि सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. आयोजक आणि कार्यवाहक श्री. प्रतीक अशोक गुरव यांनी पथकाच्या जिद्दीचे कौतुक करत पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

Total Visitor Counter

2475430
Share This Article