GRAMIN SEARCH BANNER

क्षणात संपले दोन जीव; मुंबई–गोवा महामार्गावर तरुण-तरुणीचा अपघाती मृत्यू

खेड : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत तरुण व तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

राहुल पाटील (वय २९, रा. कलनाकवाडी, जि. कोल्हापूर) आणि अनुष्का मानकर (वय २५, रा. येडेमच्छिंद्र, जि. सांगली) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही सध्या लक्ष्मी नगर, बिरवाडी (महाड) येथे वास्तव्यास होते.

मिळालेल्या माहितीनुसार, एम.एच. ०९ डीडी ८३७४ क्रमांकाच्या दुचाकीवरून ते मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर फॉरेन्सिक पथकाला देखील पाचारण करण्यात आले. तपासाअंती दोघांचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पसार झालेल्या चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.

Total Visitor Counter

3484523
Share This Article