रत्नागिरी : वाटद-खंडाळा एमआयडीसी परिसरात आज दुपारी आयोजित करण्यात आलेल्या प्रबोधन सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संपूर्ण पंचक्रोशीतील नागरिकांनी या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली एकजूट दाखवून दिली.
राज्याचे उद्योग मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत हे या सभेला संबोधित करणार असल्याने परिसरात मोठी उत्सुकता होती. आज दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावलेली असतानाही लोकांचा उत्साह कमी झाला नाही. पावसाची तमा न बाळगता गावागावातून नागरिकांनी मोठ्या संख्येने या सभेला हजेरी लावली.
या सभेला विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. विविध वयोगटांतील महिला हातात छत्र्या, रेनकोट घालून सभास्थळी दाखल झाल्या होत्या. “जय जवान, जय किसान” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
सभेमध्ये एमआयडीसी संदर्भातील नागरिकांचे मत, चिंता आणि अपेक्षा मांडण्यात आल्या. स्थानिकांच्या समस्या, रोजगाराच्या संधी, पायाभूत सुविधांचा विकास यावर भर देत शासनाच्या भूमिका स्पष्ट करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
सुरक्षितता आणि शिस्तबद्ध व्यवस्थापनामुळे सभा सुरळीत पार पडत असून, प्रशासन आणि पोलिस यंत्रणांनीही चोख बंदोबस्त ठेवला आहे.
या प्रबोधन सभेमुळे वाटद-खंडाळा परिसरात नवचैतन्य निर्माण झाले आहे, असे चित्र पाहायला मिळत आहे.
वाटद-खंडाळा येथे प्रबोधन सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद; महिलांची लक्षणीय उपस्थिती
