GRAMIN SEARCH BANNER

शिवशाही बस–ट्रकची समोरासमोर धडक; एक ठार, 11 जखमी

Gramin Varta
263 Views

महाड : मुंबई–गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील माणगाव हद्दीत कळमजे पुलाजवळ बुधवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका ज्येष्ठ प्रवाशाचा मृत्यू झाला, तर 11 जण जखमी झाले आहेत. पहाटे पडलेल्या दाट धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे.

सुमारे 7.15 च्या सुमारास मुंबई–मालवण शिवशाही बस (एम.एच. 09 ई.एम. 9027) मालवणच्या दिशेने जात होती. त्याचवेळी सीएनजी सिलिंडर वाहतूक करणारा ट्रक (एम.एच. 04 सी.के. 3421) मुंबईच्या दिशेने येत होता. कळमजे पुलाजवळ दोन्ही वाहनांमध्ये झालेल्या समोरासमोर धडकेत बसमधील प्रवासी शामसुंदर गावडे (85) यांचा जागीच मृत्यू झाला.

धडकेनंतर ट्रकमधील सीएनजी सिलिंडरला स्फोट होण्याची शक्यता निर्माण झाली होती, त्यामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले. माणगाव पोलीस आणि स्थानिक मदतकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी प्रवाशांना बाहेर काढून माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. एका जखमीची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले.

अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णत: ठप्प झाली होती. मात्र माणगाव पोलिसांनी तत्परतेने कारवाई करून वाहतूक मार्ग सुरळीत करण्यात यश मिळवले.

Total Visitor Counter

3199487
Share This Article