GRAMIN SEARCH BANNER

दानशूर उद्योगपती विलासराव (बाळूशेठ) मांजरेकर यांचे निधन; जैतापूरसह मुंबईत शोककळा

Gramin Varta
250 Views

जैतापूर : जैतापूरचे सुपुत्र, मुंबईतील मे. सत्यसाई एक्स्पोर्टचे सर्वेसर्वा, प्रसिद्ध दानशूर उद्योगपती तसेच निस्सीम साईभक्त कै. श्री. विलासराव परशुराम मांजरेकर (वय ६६) यांचे शनिवार, दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास मुंबई येथील त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने जैतापूर, मुंबईसह राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे.

कै. विलासराव मांजरेकर, सर्वत्र बाळूशेठ या नावाने परिचित होते. ते साईबाबांचे निस्सीम भक्त असून नियमितपणे शिर्डी येथे साईसेवेसाठी उपस्थित राहत असत. सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी नेहमीच उदार हाताने मदतीचा हात दिला. जैतापूर एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त तसेच जैतापूर एज्युकेशन ट्रस्ट, मुंबईचे संचालक म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. अनेक साई मंदिरांबरोबरच जैतापूर येथील श्रीदेवी वेताळ मंदिरालाही त्यांनी सातत्याने आर्थिक सहकार्य केले.

हसतमुख स्वभाव, आपुलकीने वागणारे, कोणाबद्दलही वाईट न बोलणारे आणि वाईट ऐकूनही न घेणारे व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती. मोठा मित्रपरिवार आणि सर्व स्तरातील लोकांशी असलेली जिव्हाळ्याची नाती हे त्यांच्या सामाजिक जीवनाचे वैशिष्ट्य होते.

त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, दोन कन्या, जावई, नातवंडे तसेच मोठा आप्त-मित्र परिवार आहे. आज सायंकाळी सात वाजता अंधेरी येथील त्यांच्या निवासस्थानातून अंत्ययात्रा निघणार आहे.
कै. विलासराव (बाळूशेठ) मांजरेकर यांच्या निधनाने उद्योग, समाजसेवा आणि साईभक्तीचा एक आदर्श अध्याय संपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत असून जैतापूर व मुंबई परिसर शोकसागरात बुडाला आहे.

Total Visitor Counter

3366873
Share This Article