आधार फाउंडेशनने सरपंच सौ. संस्कृती पाचकुडे यांना दिले निवेदन
रत्नागिरी: करबुडे-उक्षी रस्त्यावर लाजूळ गावाकडे जाणाऱ्या फाट्यावर (लाजूळ टप्पा) वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या ठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी जोर धरत आहे. आधार फाउंडेशन, लाजूळ या सामाजिक संस्थेने याबाबत करबुडे ग्रामपंचायतीच्या सरपंच, सौ. संस्कृती पाचकुडे यांना निवेदन सादर केले असून, त्यांनी तातडीने यावर कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.
नुकतेच डांबरीकरण झाल्यामुळे करबुडे-उक्षी रस्त्याची स्थिती खूप चांगली झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या आणि वेग दोन्ही वाढले आहेत. मात्र, याच रस्त्यावर लाजूळ गावाकडे जाण्यासाठी वळण आहे. हा ‘लाजूळ टप्पा’ एका बाजूला वळण आणि दुसऱ्या बाजूला उतार असल्याने, गावातून मुख्य रस्त्यावर येणाऱ्या वाहनचालकांना दोन्ही बाजूंनी येणारी वाहने दिसत नाहीत. याच कारणामुळे गेल्या पाच-सहा महिन्यांत येथे काही छोटे अपघात झाले आहेत.
येत्या काही दिवसांत गणेशोत्सव सुरू होत असल्याने या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे येथे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आधार फाउंडेशनने या धोकादायक वळणावर दोन्ही बाजूंनी गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे.
यावेळी निवेदन देण्यासाठी आधार फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. अक्षय बारगुडे, उपाध्यक्ष श्री. अरविंद ओर्पे, सचिव श्री. सुशांत शीतप, सल्लागार श्री. संदेश ओर्पे यांच्यासह संस्थेचे सभासद श्री. सौरभ शितप, श्री. सुनील बारगुडे, श्री. विनोद बारगुडे उपस्थित होते. सरपंच सौ. संस्कृती पाचकुडे यांनी या मागणीची दखल घेऊन लवकरच योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.