परिवर्तन धम्म प्रचार संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त वाशीत शाहिरी जलसा आणि सामाजिक नाट्यप्रयोगाचे आयोजन

Gramin Varta
239 Views

नवी मुंबई : परिवर्तन धम्म प्रचार संस्था (नोंदणीकृत), नेरुळ, नवी मुंबई यांच्या वतीने संस्थेचा नववा वर्धापन दिन सोहळा रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, कला, क्रीडा आणि पर्यावरण अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या या संस्थेची स्थापना दिवंगत बौद्धरत्न एन. पी. मोहिते (गुरुजी) यांनी केली होती. त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत संस्थेचे विद्यमान अध्यक्ष शोकेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व सभासद यांच्या सहकार्याने हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

वर्धापन दिनानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा दिवंगत बौद्धरत्न एन. पी. मोहिते (गुरुजी) स्मृती पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. यासोबतच बुद्ध, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचा प्रचार-प्रसार करणाऱ्या लोककलांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे कोकणातील ज्येष्ठ कलावंत दिवंगत नागेश देवराम जाधव निर्मित प्रज्ञा कलामंच कलानिकेतन आंबेडकरी जलसा, रत्नागिरी यांचा प्रबोधनात्मक शाहिरी जलसा होय. अनेक वर्षांपासून महापुरुषांचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करणाऱ्या या जलशामध्ये ‘बुद्ध-भीम गीतांचा संग्राम’ सादर होणार आहे. तसेच आशुतोष अजित जाधव लिखित व दिग्दर्शित ‘परिवर्तन’ हे सामाजिक आशय असलेले दोन अंकी नाटकही रंगमंचावर सादर करण्यात येणार आहे.

कोकणातील आंबेडकरी शाहिरी जलशाची परंपरा आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश घेऊन येणारा हा कार्यक्रम नवी मुंबईतील रसिकांसाठी विशेष पर्वणी ठरणार असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश शुल्क १५० रुपये व २०० रुपये असे ठेवण्यात आले असून, समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी उपस्थित राहून या सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रमासंदर्भातील अधिक माहितीसाठी ९७०२७३१००८, ९३२६१६१८७६, ९५४५०३३९६३ आणि ९९२०९२४३१५ या क्रमांकांवर संपर्क साधता येणार आहे.

Total Visitors :
4783634
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *