GRAMIN SEARCH BANNER

साडवलीत चोरट्यांचा धुमाकूळ! एका आठवड्यात चार बंद घरे फोडली

Gramin Varta
195 Views

देवरूख:देवरूखजवळील साडवली सप्तलिंगीनगर येथे चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, शुक्रवारी मध्यरात्री तीन घरे फोडण्याचा प्रयत्न केल्यानंतर सोमवारी सकाळी पुन्हा दोन भाडेकरूंची बंद घरे फोडल्याचे समोर आले आहे. अवघ्या काही दिवसांत सलग घडलेल्या या घटनांमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चोरीच्या या सर्व प्रयत्नांची माहिती देवरूख पोलिसांना देण्यात आली आहे. साडवली सप्तलिंगी नगर या भर वस्तीत चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री बंद घरांना लक्ष्य केले होते. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे अनेक कुटुंबे बाहेरगावी गेली होती. याचाच गैरफायदा घेत चोरट्यांनी आनंद बोंद्रे, विश्वनाथ जवरत (आणि त्यांचे भाडेकरू) तसेच सुजित जाधव यांच्या घरांचे दरवाजे तोडले, पण त्यांना काहीही ऐवज मिळाला नाही. महत्त्वाची बाब म्हणजे हे तिघे चोरटे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

या घटनेची चर्चा सुरू असतानाच सोमवारी सकाळी आणखी दोन बंद घरे फोडल्याची माहिती पुढे आली आहे. राजाराम घाग यांच्या मालकीच्या घरात राहणारे भाडेकरू गराटे आणि महाजन हे सुट्ट्यांसाठी गावी गेले होते. गराटे सोमवारी सकाळी त्यांच्या खोलीवर परतले असता, त्यांच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले, तर महाजन यांच्या दरवाजाचे कुलूपच जागेवर नव्हते. गराटे यांच्या घरातही चोरीचा प्रयत्न झाला, पण कोणतीही वस्तू चोरीला गेली नाही, असे त्यांनी सांगितले. महाजन अद्याप परतले नसल्याने त्यांच्या खोलीतून काय चोरी झाले आहे, हे निश्चित झालेले नाही. तसेच, चोरट्यांनी सुजित जाधव यांच्या दुचाकीची नंबर प्लेट चोरली होती, जी नंतर महाजन यांच्या दारात मिळून आली. गराटे यांच्या दुचाकीची नंबर प्लेट काढण्याचा प्रयत्न करताना शेजारील घरात लाईट लागल्याने चोरट्यांनी पळ काढल्याचे प्राथमिक तपासणीत स्पष्ट झाले आहे. देवरूख पोलीस या वाढत्या घरफोडीच्या प्रयत्नांचा गंभीरपणे तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3369364
Share This Article