GRAMIN SEARCH BANNER

ऐन गणेशोत्सवात कोत्रेवाडी ग्रामस्थांचे उपोषण सुरूच

लांजा: कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डम्पिंग ग्राउंड हटाव साठी ग्रामस्थांच्या वतीने छेडण्यात आलेले लाक्षणिक बेमुदत उपोषण ऐन गणेशोत्सवात, सलग पंधराव्या दिवशी सुरूच आहे .मात्र प्रशासनाकडून उपोषणकर्त्यांची बोलवण केली जात असल्याने उपोषणकर्त्या ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे .

लांजा नगरपंचायतीच्या वतीने कोत्रेवाडी येथे डम्पिंग ग्राउंड प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाकडे जाण्यासाठी कोणताही अधिकृत शासकीय रस्ता नाही. जवळ जलस्त्रोत आहेत. वाडीवस्ती अवघ्या १८० मीटरवर आहे. इतक्या साऱ्या डंपिंग विरोधातील गोष्टी असूनदेखील लांजा नगरपंचायतीच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात या जागेचे खरेदीखत करण्यात आले होते. अशाप्रकारे सर्व शासकीय नियम धाब्यावर बसवून लांजा नगरपंचायत प्रशासनाकडून कोत्रेवाडी येथे डम्पिंग ग्राउंड प्रकल्प प्रस्तावित करण्यात आलेला आहे.

या विरोधात आणि डम्पिंग ग्राउंड हटाव साठी कोत्रेवाडी ग्रामस्थांच्या वतीने दिनांक १४ ऑगस्ट पासून बेमुदत उपोषण सुरू आहे .आज गुरुवारी २८ ऑगस्ट रोजी उपोषणाचा सलग पंधरावा दिवस आहे. तर गणेशोत्सवाला सुरुवात होऊन दुसरा दिवस उजाडला तरी देखील प्रशासनाकडून ग्रामस्थांना ठोस उत्तर दिले जात नसल्याने ग्रामस्थ आपल्या उपोषणावर ठाम राहिले आहेत. नगरपंचायत प्रशासनाने चुका करायच्या आणि आम्ही ग्रामस्थांनी त्या भोगायच्या का? असा संतप्त सवाल उपोषणकर्त्या ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे .

आज गणेशोत्सवासारख्या मंगलमय सणात गणपती बाप्पा घरी विराजमान झालेले असताना कोत्रेवाडी ग्रामस्थ मात्र डम्पिंग ग्राउंड हटावसाठी उपोषणाला बसलेले आहेत. गणेशोत्सवासारख्या उत्सवात ग्रामस्थांवर उपोषण करण्याची वेळ येते, ही प्रशासनाची दुर्दम्य चूक असून प्रशासनाच्या चुकीमुळेच आज ग्रामस्थांवर ही वेळ आली असून प्रशासनाने आता तरी शहाणे होऊन ग्रामस्थांना योग्य तो न्याय द्यावा, अशी मागणी कोत्रेवाडी ग्रामस्थांनी केली आहे.

Total Visitor Counter

2475220
Share This Article