गावखडी / वार्ताहर: रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मेर्वी गुरववाडी (से.मी. इंग्रजी) येथील विद्यार्थ्यांना नुकतेच भाताची रोपे काढणे आणि ती लावणे याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. संतोष मुढे सर आणि सहकारी शिक्षक श्री. मसरत शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी श्रीम. शारदा गुरव आणि श्रीम. वर्षा गुरव यांनीही सहभाग नोंदवला.
शालेय शिक्षणाच्या पारंपरिक चौकटीबाहेर जाऊन विद्यार्थ्यांना काहीतरी वेगळे शिकवण्यास शाळा नेहमीच तत्पर असते. या उपक्रमातून मुलांनी अत्यंत आनंदाने या प्रात्यक्षिकात सहभाग घेतला. शाळेतील शिक्षक मुलांना नवनवीन गोष्टी शिकवण्यासाठी नेहमीच उत्साही असतात आणि त्यासाठी धडपड करत असतात. या अनोख्या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. मेर्वी गुरववाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना भाताची रोपे काढणे आणि ती लावणे याचे प्रात्यक्षिक दाखवताना मुख्याध्यापक श्री. संतोष मुढे, शारदा गुरव आणि वर्षा गुरव उपस्थित होते.