रत्नागिरी: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, रत्नागिरी यांच्या वतीने ‘अंगदान जीवन संजीवनी अभियान’ अंतर्गत शहरात अंगदान जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीला विद्यार्थ्यांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दि. ३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत हे अभियान राबवण्यात येत आहे.
या रॅलीची सुरुवात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. यावेळी डॉ. रामानंद यांनी अंगदानाच्या गरजेविषयी सविस्तर माहिती दिली. जास्तीत जास्त लोकांपर्यंत अंगदानाचं महत्त्व पोहोचावं, यासाठी जनजागृती करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. त्यानंतर, त्यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ केला.
महाविद्यालयापासून सुरू झालेली ही रॅली बस स्थानकावरून पुन्हा महाविद्यालयात परत येऊन समाप्त झाली. या रॅलीमध्ये नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उपअधिष्ठाता डॉ. रामा भोसले, अधिसेविका जयश्री शिरधनकर यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.