खेडमध्ये एसटी बसमध्ये विद्यार्थिनीची छेडछाड; संशयित वाहक निलंबित

Gramin Varta
11 Views

खेड : तालुक्यातील एका महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीची एसटी बसमध्ये छेडछाड केल्याची संतापजनक घटना शुक्रवारी सकाळी घडली.

याप्रकरणी एसटी वाहक बी.डी. गोचडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सायंकाळी उशिरापर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या गंभीर दखल घेत एसटी प्रशासनाने या वाहकास तत्काळ सेवेतून निलंबित केले आहे.पीडित विद्यार्थिनी शुक्रवारी सकाळी खेड आगाराच्या बसने प्रवास करत होती.

यादरम्यान एसटी वाहक गोचडे याने विद्यार्थिनीकडे वेगवेगळ्या प्रकारची माहिती विचारत छेडछाड केली. या प्रकारामुळे घाबरलेली विद्यार्थिनी आसनावरून उठून बाजूला उभी राहिली. मात्र, बसमधून खाली उतरल्यानंतरही वाहकाने तिचा पाठलाग करत मोबाईल नंबर मागण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे.

बसमध्ये घडलेला हा संतापजनक प्रकार पीडित युवतीने न घाबरता तातडीने महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या कानावर घातला. त्यानंतर शिवसेना उपनेते संजय कदम यांनी थेट खेड बस स्थानक गाठले.

यावेळी बस स्थानकप्रमुख अनुपस्थित असल्याने आणि आगारप्रमुखांशी संपर्क साधल्यानंतर ते स्थानकात उशिरा दाखल झाल्याने कदम यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. यादरम्यान चिपळूण येथे सेवा बजावत असलेल्या संशयित वाहकाला एसटी प्रशासनाने तातडीने खेड बस स्थानकात बोलावून घेतले. वाहक तिथे पोहोचताच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. आगारप्रमुखांनी या घटनेचा सविस्तर अहवाल वरिष्ठांना पाठवला होता, त्यानुसार विभागीय वाहतूक नियंत्रकांनी कारवाई करत आरोपी वाहकास निलंबित केले आहे. पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.

Total Visitors :
4667317
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *