राजापूर (प्रतिनिधी): तालुक्यातील दोनिवडे येथे भारत संचार निगमतर्फे (बीएसएनएल) एक वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला मोबाईल टॉवर अद्यापही कार्यान्वित झालेला नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. हा टॉवर तात्काळ सुरू करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दोनिवडे येथील सहयोग प्रतिष्ठान या संघटनेने दिला आहे. यासाठी संघटनेने बीएसएनएलच्या रत्नागिरी येथील व्यवस्थापकांना निवेदन दिले असून, ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत टॉवर कार्यान्वित करण्याची डेडलाईन दिली आहे.
सहयोग प्रतिष्ठानचे म्हणणे आहे की, दोनिवडे येथील टॉवरचे काम जानेवारी २०२५ रोजीच पूर्ण झालेले आहे. या कामाला आज एक वर्ष पूर्ण झाले असले तरी, बीएसएनएल कंपनीने तो चालू केलेला नाही. यामुळे ग्रामस्थांचे मोठे हाल होत असून, ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीने सातत्याने पाठपुरावा करूनही कंपनीने याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सहयोग प्रतिष्ठानने या मागणीसाठी खासदार नारायण राणे, पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनाही निवेदन पाठवून लक्ष वेधले आहे. निवेदनाद्वारे त्यांनी स्पष्ट केले आहे की, जर हा टॉवर लवकरात लवकर चालू झाला नाही, तर बीएसएनएलच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल.
निवेदन देतेवेळी सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनंत गुरव, उपाध्यक्ष विष्णू शिरवडकर, सचिव अमोल करगुंटकर, प्रवीण तोरस्कर, अमित पडवळ यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व दोनिवडे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बीएसएनएलच्या या दिरंगाईमुळे दळणवळणाची समस्या निर्माण झाली असून, आता सहयोग प्रतिष्ठानच्या आंदोलनाच्या भूमिकेकडे प्रशासनाचे लक्ष लागून राहिले आहे.