लांजा : लांजा तालुक्यातील एका शाळेत काही दिवसांपूर्वी उघड झालेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाने संपूर्ण परिसराला हादरवून सोडले आहे. घटनेनंतर परिसरात उलटसुलट चर्चा रंगल्या असून, “ती शाळा नेमकी कोणती?” या प्रश्नावर सर्वत्र तर्क-वितर्क सुरू आहेत. मात्र या प्रकरणानंतर शिक्षकांनी मात्र तेरी भी चूप, मेरी भी चूप चे धोरण अवलंबले आहे.
घटनेची माहिती समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पालकवर्गाने शाळांतील सुरक्षेच्या बाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, स्थानिक प्रशासनानेही या गंभीर प्रकरणाची दखल घेतली आहे.
संबंधित मुलगी आणि आरोपी हे अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून तपासाची सूत्रे त्यांच्या हाती आहेत. घटनेमागील सर्व पैलूंचा सखोल शोध घेण्यासाठी चौकशी सुरू आहे.
दरम्यान, ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेचे नाव विविध ठिकाणी कुजबुजले जात असले तरी अधिकृतरीत्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. स्थानिक शिक्षकवर्ग व शिक्षण विभाग मात्र या संपूर्ण प्रकरणावर मौन बाळगताना दिसत आहेत. त्यामुळे “तेरी भी चूप, मेरी भी चूप” अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
प्रशासन आणि शिक्षण विभागाकडून या घटनेबाबत पारदर्शक तपास व्हावा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.
लांज्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणानंतर गावभर चर्चा; ती शाळा कोणती? शिक्षकांचे मौन
