चिपळूण: शांत, सुसंस्कृत आणि सुशिक्षित शहर म्हणून ओळख असलेल्या चिपळूणमध्ये बुधवार, १५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी घडलेल्या एका अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटनेमुळे संपूर्ण शहर हादरले आहे. शहरातील एका खाजगी शाळेत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेच्या व्हॅन चालकाने विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे पालक, शिक्षक आणि नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपी व्हॅन चालकाला तत्काळ अटक केली आहे. त्याच्यावर पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदर आरोपी चिपळूण शहरातीलच रहिवासी असल्याचे समजते. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दररोजप्रमाणे शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनी व्हॅनने घरी जात असताना, व्हॅन चालकाने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेत तिच्यावर अशोभनीय कृत्य केले. या घटनेमुळे पालकांनी मुलीला शाळेत पाठवल्यानंतर ती सुरक्षित राहील या विश्वासाला तडा गेला आहे. मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या घटनेच्या निषेधार्थ तसेच आरोपीला कठोर शासन व्हावे या मागणीसाठी जिजाऊ ब्रिगेडने पोलीस निरीक्षक माननीय मेंगडे साहेब यांच्याकडे निवेदन दिले आहे. रत्नागिरी जिल्हा जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने दिलेल्या निवेदनात, “या नराधमाला केवळ शिक्षा नव्हे, तर फाशीची शिक्षा द्यावी,” अशी मागणी सर्व स्तरांतून आणि प्रामुख्याने जिजाऊ ब्रिगेडकडून जोर धरत आहे. प्रशासनाने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शाळा वाहनांच्या सुरक्षाविषयक नियमांचे कठोर पालन होईल याची खात्री करावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. महिला आणि मुलींची सुरक्षितता हा आता खूप मोठा प्रश्न बनला असून, या नराधमाला कायद्याने कठोरतम शिक्षा होऊन पीडित मुलीला न्याय मिळावा, अशी विनंती रत्नागिरी जिल्हा चिपळूण जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.
निवेदन देताना रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष स्नेहल चव्हाण, मुस्लिम जिजाऊ ब्रिगेड अध्यक्ष आणि जिजाऊ ब्रिगेड चिपळूण सदस्य सईदा शेख, खेड तालुका अध्यक्ष रोहिणी मोरे, तालुका संघटक संध्या घाडगे, दिलबर खान, आशाताई गायकवाड, पूनम भोजने आदी पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.