GRAMIN SEARCH BANNER

पोलादपूर खून प्रकरणात खळबळजनक माहिती : महिलेकडून ५ जणांशी लग्न करून लाखोंची फसवणूक

पोलादपूर : कार व्यावसायिकाच्या खूनप्रकरणी अटकेत असलेल्या वंदना दादासाहेब पुणेकर (३६, रा. जयसिंगपूर, कोल्हापूर) हिने यापूर्वी पाच जणांशी लग्न करून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिच्यावर सांगली जिल्ह्यात दोन चोरीचे गुन्हेही दाखल असल्याचे पोलिस तपासातून उघड झाले आहे.

या प्रकरणात वंदना पुणेकरसह मोहन पांडुरंग सोनार (५४, रा. बोरसूत, संगमेश्वर, रत्नागिरी) आणि अक्षय जाधव या तिघांना पोलादपूर पोलिसांनी अटक केली आहे.

२७ एप्रिल रोजी चिपळूण तालुक्यातील सती येथे राहणारे सुनील दादा हसे (५४, रा. अंबड-अकोले, नाशिक) हे वॅगनार कार भाड्याने देण्याचा व्यवसाय करत होते. लिफ्ट देण्याच्या निमित्ताने त्यांची वंदना पुणेकरशी ओळख झाली. सुनील हसे हे श्रीमंत असल्याचा संशय महिलेला आल्याने तिने त्याला फसवण्याचे डावपेच आखले.

तिने सुरुवातीला सुनील हसे यांना गुंगीचे औषध पाजले आणि नंतर कारच्या मागील आसनावर बसून ओढणीने गळा आवळून त्याचा खून केला. त्यानंतर मोहन सोनार व अक्षय जाधव यांच्या मदतीने मृतदेह पोलादपूर हद्दीतील कशेडी घाटात जुन्या महामार्गालगतच्या दरीत फेकून दिला.

३० एप्रिल रोजी पहाटे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर भोगाव-पोलादपूरच्या पोलीस पाटील शुभांगी उतेकर यांनी पोलिसांना माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू करण्यात आला.

फक्त चार दिवसांत पोलिसांनी संशयित अक्षय जाधवला अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे उर्वरित दोघांनाही पोलिसांनी कर्नाटक सीमाभागातून अटक केली. ते सलग दोन महिने पोलिसांना चकवा देत लपून बसले होते.

वंदना पुणेकर हिने आधी पाच जणांशी लग्न केल्याची आणि त्यांच्याकडून पैसे उकळल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. आर्थिक फायद्यासाठी गुन्हे करण्याची तिची पद्धत ही तपास यंत्रणेसाठी डोकेदुखी ठरत आहे.

Total Visitor Counter

2475126
Share This Article