कोकण विभागीय आयुक्तालयाचा महत्त्वपूर्ण उपक्रम
मुंबई : कोकण विभागातील समृद्ध इतिहास, निसर्गसौंदर्य आणि धार्मिक परंपरेचा वारसा आता सर्वसामान्य नागरिकांसह पर्यटकांनाही सहज उपलब्ध होणार आहे. कोकण विभागीय आयुक्त यांच्या divcomkonkan.gov.in अधिकृत संकेतस्थळावर कोकणातील गड-किल्ले, पर्यटनस्थळे तसेच धार्मिक पर्यटनस्थळांची सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली असून, यामुळे संपूर्ण कोकण विभागातील अनेक लहान-मोठ्या, प्रसिद्ध तसेच दुर्लक्षित पर्यटनस्थळांची माहिती एकाच ठिकाणी पाहता येणार आहे.
हा उपक्रम पर्यटनप्रेमी, अभ्यासक, विद्यार्थी तसेच कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
कोकण विभागात मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे सात जिल्हे समाविष्ट आहेत. या सर्व जिल्ह्यांना ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वैभवाची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत वसलेले गड-किल्ले, अरबी समुद्रालगतची नितळ समुद्रकिनारे, हिरवीगार जंगले, नद्या, धबधबे, लेणी तसेच प्राचीन मंदिरे, दर्गे, चर्च यामुळे कोकण विभाग पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
कोकण विभागीय आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या माहितीत रायगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, रत्नदुर्ग, सुवर्णदुर्ग, कुलाबा, कर्नाळा यांसारख्या ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याशी निगडित असलेले हे किल्ले केवळ ऐतिहासिकच नव्हे तर साहसी पर्यटनासाठीही आकर्षण ठरत आहेत. किल्ल्यांचा इतिहास, स्थान, पोहोचण्याचे मार्ग, आजूबाजूची ठिकाणे यांची माहिती उपलब्ध करून देण्यात आल्याने पर्यटकांना नियोजन करणे अधिक सुलभ झाले आहे.
यासोबतच कोकणातील प्रमुख पर्यटनस्थळांची माहितीही संकेतस्थळावर देण्यात आली आहे. अलिबाग, मुरुड-जंजिरा, माथेरान, भिवपुरी, कर्जत, हरिहरेश्वर, दापोली, गणपतीपुळे, तारकर्ली, देवबाग, वेंगुर्ला, आंबोली घाट यांसारख्या निसर्गरम्य ठिकाणांचा यात समावेश आहे. समुद्रकिनारे, थंड हवेची ठिकाणे , धबधबे, जलक्रीडा, जैवविविधता आणि स्थानिक संस्कृती यांची माहिती उपलब्ध झाल्याने कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल असे मत ठाणे जिल्हा प्रशासनकडून व्यक्त करण्यात आले. एकाच संकेतस्थळावर संपूर्ण विभागाची पर्यटन माहिती उपलब्ध झाल्याने कोकणातील पर्यटनाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार असून, स्थानिक रोजगार, व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे.
धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनेही कोकण विभाग अत्यंत समृद्ध आहे. सिद्धिविनायक (मुंबई), महालक्ष्मी मंदिर, घृष्णेश्वर कोकणातील प्रमुख मंदिरांमध्ये गणपतीपुळे येथील श्री गणपती मंदिर, हरिहरेश्वर मंदिर, केळशी, परशुराम मंदिर (चिपळूण), कणकादित्य यांचीआणि विविध धार्मिक स्थळांची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. यामुळे भाविकांना दर्शनयोजना आखणे अधिक सोपे होणार आहे.
कोकणातील गड-किल्ले आणि पर्यटन स्थळांची माहिती एकाच संकतेस्थळावर!





