GRAMIN SEARCH BANNER

कामथे येथे २०० खाटांचे नवे रुग्णालय प्रस्तावित; शासनाकडे मंजुरीची मागणी

आ. शेखर निकम यांचे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश आबिटकर यांना पत्र

चिपळूण (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य सुविधा बळकट करण्याच्या दृष्टीने चिपळूण तालुक्यातील कामथे येथे २०० खाटांचे नवे रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला असून, त्यास तातडीने मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली आहे. आ. शेखर निकम यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. प्रकाश आबिटकर यांना याबाबत सविस्तर पत्र दिले आहे.

सध्या कामथे येथील उपजिल्हा रुग्णालय ५०+२० खाटांचे असून ते मुंबई-गोवा महामार्गालगत कार्यरत आहे. मात्र, रत्नागिरी जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे (DMER) हस्तांतरित झाल्यामुळे जिल्ह्यासाठी स्वतंत्र २०० खाटांच्या सर्वसामान्य रुग्णालयाची आवश्यकता निर्माण झाली आहे. चिपळूण हे रत्नागिरी जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असून, संगमेश्वर, खेड, गुहागर आदी तालुक्यांतील रुग्णांसाठी ते सोयीचे केंद्र आहे. त्यामुळे कामथे येथेच २०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारल्यास संपूर्ण जिल्ह्याला मोठा दिलासा मिळणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी यांनी उपसंचालक, आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाकडे १६ डिसेंबर २०२५ रोजी सादर केल्याची माहिती पत्रात नमूद करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रस्तावास शासन स्तरावर तातडीने मंजुरी देऊन त्याची अंमलबजावणी सुरू करावी, तसेच संबंधित विभागांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी विनंती आ. निकम यांनी केली आहे. कामथे येथे २०० खाटांचे आधुनिक रुग्णालय उभारण्यात आल्यास कोकणातील आरोग्य सेवेला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Total Visitor Counter

3468192
Share This Article