दापोली : दापोली पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेत मोठी धडक कारवाई केली आहे. मंडणगड तालुक्यातील साखरी खाडीकिनारी कांदळवनात लपवून ठेवलेल्या तब्बल ४.५१ किलो अमली पदार्थाच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या असून या घटनेने संपूर्ण कोकणात खळबळ उडाली आहे.
याआधी १५ सप्टेंबर रोजी दापोली पोलिसांनी केळशी किनारा मोहल्ल्यातून अब्रार डायली याला पकडून त्याच्याकडून ९९८ ग्रॅम अमली पदार्थ (किंमत सुमारे ४ लाख रुपये) जप्त केले होते. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. चौकशीत त्याने अखिल होडेकर याच्याकडे आणखी पिशव्या असल्याचे पोलिसांना सांगितले.
यानंतर पोलिसांनी अखिल होडेकर याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने ४ पिशव्या स्वतःकडे ठेवल्याचे आणि त्या साखरी खाडीकिनारी कांदळवनात टाकल्याची कबुली दिली. या माहितीनुसार २० सप्टेंबर रोजी सकाळी दापोली पोलिसांचे पथक घटनास्थळी गेले. कांदळवनाची तपासणी केली असता तेथे ४ पिशव्या आढळून आल्या व पंचनामा करून त्या जप्त करण्यात आल्या.
आतापर्यंतच्या कारवाईत दापोली पोलिसांनी तब्बल २२ लाख ९२ हजार ४०० रुपयांचे अमली पदार्थ हाती लावले आहेत. या कारवाईत पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर, उपनिरीक्षक राजकुमार यादव, उपनिरीक्षक महेश पाटील, हेड कॉन्स्टेबल मोरे, कॉन्स्टेबल कर्देकर, देवकुळे, मडके आदी सहभागी होते.
सध्या या प्रकरणी दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल असून, आणखी काही जणांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास उपनिरीक्षक महेश पाटील करीत आहेत.
दापोली साखरी खाडीकिनारी कांदळवनातून ४.५१ किलो अमली पदार्थ जप्त
