रत्नागिरी: गेल्या अनेक दिवसांपासून गोडाऊन स्टॉप येथील शाळेतील विद्यार्थ्यांना बससेवेअभावी अनंत अडचणींचा सामना करावा लागत होता. विद्यार्थी आणि पालकांच्या तक्रारीनंतर सामाजिक कार्यकर्त्ये संतोष सावंत पुढाकार घेत केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. आज (सोमवार) सकाळपासून गोडाऊन स्टॉपवर एसटी बससेवा पूर्ववत सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा वनवास संपला असून, त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
गेल्या काही दिवसांपासून गोडाऊन स्टॉप येथील विद्यार्थी आणि पालकांना बसच्या समस्येने ग्रासले होते. बस वेळेवर येत नसल्याने किंवा अनेकदा थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचताना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. या गंभीर समस्येची दखल घेत एका सामाजिक कार्यकर्त्याने फेसबुकच्या माध्यमातून ही व्यथा मांडली होती. तसेच, त्यांनी स्वतः एसटी प्रशासनाशी संपर्क साधून वस्तुस्थिती निदर्शनास आणली. प्रशासनानेही यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते.
या आश्वासनानुसार, आज सकाळी गोडाऊन स्टॉपवर एसटी बस दाखल झाली. बस येताच शाळेतील विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला आणि संपूर्ण बस विद्यार्थ्यांच्या गर्दीने भरून गेली. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट दिसत होते. एसटी प्रशासनाने घेतलेल्या या सकारात्मक निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शाळेत जाण्याचे हाल थांबले असून, शिक्षण प्रवासातील एक मोठा अडथळा दूर झाला आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिक आणि पालकांनी एसटी प्रशासनाचे आणि पाठपुरावा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.